पालीमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचा विळखा
पालीमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचा विळखा

पालीमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचा विळखा

sakal_logo
By

पाली, ता. ७ (वार्ताहर) : पाली-खोपोली-वाकण राज्यमहामार्गावर विविध अतिक्रमण होत आहेत. रस्त्याच्या कडेला काही कंपन्या, फार्महाऊस बेकायदा जाहिरात फलक लावत असताना आता अनधिकृत वाहनतळही झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या कडेच्या लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांमुळे अपघातांना आमंत्रण दिले जात आहे.
रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेल्या जाहिरात फलकांमुळे साईडपट्टीवर वाहने थांबवताना अडचण होत आहे. वळण असलेल्या ठिकाणी जाहिरात फलकांमुळे समोरून येत असलेले वाहन दिसत नाहीत. परिणामी, वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागते. अनावधानाने एखादे वाहन रस्ता सोडून खाली उतरले, तर जाहिरात फलकावर आदळून अपघात होण्याची शक्यता आहे. नियमाप्रमाणे रस्त्यापासून काही मीटर अंतर सोडून जागेचा वापर करता येतो. परंतु या ठिकाणी रस्त्याला लागूनच जाहिरातींचे फलक लागलेले आहेत. या अनधिकृत फलकांवर कोणाचे अंकुश नाही का? एमएसआरडीसी याकडे दुर्लक्ष का करत आहे? असे प्रश्न नागरिक करत आहेत.

अनधिकृत वाहनतळ
पाली फाट्यापासून काहीच अंतरावर असलेल्या देवन्हावे गावच्या हद्दीत असणाऱ्या एका कंपनीने अवैधरित्या रस्त्याला लागूनच वाहनतळ बनवले आहे. रस्त्यापासून ठराविक अंतर न सोडता रस्त्याच्या साईडपट्टीलाच वाहनतळ आहे. याकडेही एमएसआरडीसीने दुर्लक्ष केले आहे. पाली-खोपोली-वाकण राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम अद्याप १०० टक्के पूर्ण झाले नाही.

कामाच्या देखरेखीसाठी एमएसआरडीसीचे अधिकारी रस्त्यावरून सतत फिरत असतात. तरीही अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. महामार्गावरील अतिक्रमणाची पाहणी करून अनधिकृत जाहिरात फलक हटवले पाहिजेत. तसेच अवैध पार्किंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी.
- सुनील साठे, अध्यक्ष, सुधागड तालुका मनसे

खोपोली-पाली राज्य महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक जाहिरात फलक आणि देवन्हावे हद्दीत असणाऱ्या कंपनीचे वाहनतळाची पाहणी केली जाईल. पाहणी केल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी