
बोरीस-गुंजीस ग्रामपंचायतीचा हायटेक कारभार
अलिबाग, ता. ७ : तालुक्यातील बोरीस-गुंजीस ग्रुपग्रामपंचायतीने डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करीत घरक्रमांकाऐवजी क्यूआर कोडद्वारे करवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक घराच्या दर्शनी भागात लावलेल्या क्यूआर कोडद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी भरणा केला जाणार आहे. कर भरण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली राबवणारी बोरीस-गुंजीस ग्रामपंचायत राज्यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे.
ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, नागरिकांचा बऱ्याच गोष्टी घरबसल्या मिळाव्यात, या उद्देशातून स्थानिक प्रशासनाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकसित केलेल्या अमृतग्राम डिजिटल करप्रणालीचा ग्रामपंचायतीने अवलंब केला आहे.
सोमवार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, ग्रामपंचायतीच्या सरपंच सदिच्छा पाटील यांच्या हस्ते अनौपचारिक ऑनलाईन करवसुली प्रणालीच्या क्यूआर कोडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच मोहिनी वेंगुर्लेकर, ग्रामसेविका कविता काळे, सदस्य धवल राऊत, सदस्या सानिका म्हात्रे, रेखा म्हात्रे, सुप्रिया नारकर, सदस्य हेमंत पडते, सदस्य रवींद्र बेर्डे उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेने अमृतग्राम डिजिटल करप्रणाली विकसित केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभांगी नाखले, ग्रामविस्तार अधिकारी डी.एल. साळावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कर वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
वेळ व श्रमाची बचत
करवसुलीत सुलभता आणण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रत्येक घरासाठी पूर्वी जो घर क्रमांकाचा बिल्ला दिला जाई, त्या ऐवजी क्यूआर कोड दिला जाणार आहे. हा क्यूआर कोड घराच्या दर्शनी भागात लावल्यानंतर ग्रामपंचायतीचा कर्मचारी तो स्कॅन करून कर वसूल करेल, अशी यंत्रणा राबवण्यात आली आहे. पूर्वी कर वसुलीसाठी गेल्यानंतर घरात कोणीही नसल्यास कर्मचाऱ्यास रिकामी हाती परतावे लागे. त्यामुळे वाया जाणारे वेळ आणि श्रम वाचणार आहे.