अलिबाग समुद्र किनाऱ्याची धूप थांबणार

अलिबाग समुद्र किनाऱ्याची धूप थांबणार

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : अलिबाग कोळीवाडा आणि आजूबाजूच्या परिसराची धूप थांबवून चौपाटीचे संरक्षण व्हावे यासाठी पंधरा वर्षांपूर्वी गॅबियन पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला होता. समुद्राच्या लाटांमुळे हा बंधारा नादुरुस्त झाला आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्‍तीसाठी ५ कोटी रुपये अंदाजित खर्चास मंजुरी मिळाली आहे. मोठ्या दगडांपासून ४०० मीटर लांबीचा धूपप्रतिबंधक बंधारा पतन विभागाकडून बांधण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या बंधाऱ्याला सीआरझेडची परवानगी मिळाली आहे. यापूर्वी बांधलेला गॅबियन पद्धतीचा बंधारा नादुरुस्त झाला आहे. अनेक ठिकाणी जाळीचे वेष्टण तुटल्‍याने बंधाराऱ्याचे दगड निखळले आहेत. याचा तडाखा मान्सूनमध्ये बसत असून अलिबाग कोळीवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसू लागले आहे. बंधाऱ्याची वेळेत दुरुस्ती होणे आवश्यक होते, यासाठी कोळीवाड्यातील नागरिकांनी दुरुस्तीची मागणी लावून धरली होती.
उधाणाचे पाणी मासळी सुकवण्याच्या खळ्यात जात असल्याने मासळी सुकवण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय थेट कोळीवाड्यात पाणी शिरत असल्‍याने येथील घरांनाही धोका निर्माण झाला आहे. नव्या बंधाऱ्यामुळे स्‍थानिकांची गैरसोय दूर होईल.

पुण्यातील संस्‍थेकडून आराखडा तयार
नवीन बंधाऱ्यासाठी वायशेत आणि मापगाव येथील दगडखाणीतून दगड आणले जाणार आहेत. मोठे दगड उधाणाच्या लाटांमध्येही तग धरू शकणारे असतील. या बंधाऱ्याचा आराखडा पुणे येथील सीडब्ल्यूपीआरएस या संस्थेकडून निश्चित करण्यात आलेला आहे.

सीआरझेडची परवानगी आल्याने बंधाऱ्याच्या कामातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. पूर्वीचे जाळीचे वेष्टण तुटल्याने दगड उधाणाच्या लाटांमुळे बाहेर येत आहेत. जाळीचा वापर पुन्हा न करता मोठे दगड वापरले जातील, ते उधाणाचे पाणी थोपवण्यास सक्षम असतील.
- कल्पेश सावंत, सहायक अभियंता, पतन विभाग, अलिबाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.