ओली मासळीतून कोट्यवधीची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओली मासळीतून कोट्यवधीची उलाढाल
ओली मासळीतून कोट्यवधीची उलाढाल

ओली मासळीतून कोट्यवधीची उलाढाल

sakal_logo
By

अलिबाग, ता. १२ (बातमीदार)ः थंडीला सुरुवात झाल्यापासून सुरमई, बांगडा, कोळंबी, मुशी, बगा सारख्या मासळीचा हंगाम सुरू झाला आहे. मासेमारीला जाणाऱ्या बोटीतून तीन टनापासून पाच टनापर्यंत मासळी मिळत असल्याने मच्छीमारांना लॉटरी लागली आहे. दीड महिन्यात सुमारे शंभर टन मासळी जाळ्यात अडकल्‍याने मच्छीमारही आनंदात आहेत. मासळीचा लिलाव करण्यापासून व्यावसायिकांसह खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. एक-दीड महिन्यात दहा कोटीची उलाढाल झाल्‍याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्याला २४० किमीचा समुद्र किनारा लाभला असून ४६ मच्छीमार सहकारी संस्था कार्यरत आहेत. अधिकृत बोटी २,२५५ असून त्यात २,०९४ बोटी यांत्रिकी व १६१ बोटी बिगर यांत्रिकी आहेत. बोटीवर सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. त्‍यांच्याकडून मासळी उतरविणे, वाहतूक करणे, मासळी सुकवणे, बाजारात विक्रीसाठी नेणे अशा प्रकारची कामे केली जातात.
मासेमारी व्यवसायावर सुमारे एक लाखांहून अधिक नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. खोल समुद्रात जाळे टाकून मासळी मिळविण्यापासून मासळी बोटीतून काढणे, निवडणे, बर्फामध्ये ठेवून त्याची योग्य पद्धतीने वाहतूक करणे, बाजारात विक्रीसाठी नेणे, वेगवेगळ्या कंपन्यांपर्यंत मासळी पोहचवणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात.
थंडीच्या हंगामात सुरमई, कोळंबी, मुशी, बगा, ढोमा अशा प्रकारची मासळी मोठ्या प्रमाणात मिळण्यास सुरुवात होते. लहान मच्छीमारांपासून मोठ्या मच्छीमारांना सुरमई, मुशी, बगा या मासळींची सध्या लॉटरी लागली आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीमागे पाच टनापर्यंत मासळी मिळायची, मात्र आता प्रदूषण, हवामान बदलामुळे बोटीमागे दीड-दोन टन मासळी मिळू लागली आहे. सध्या वातावरण चांगले असल्‍याने मासळी मुबलक प्रमाणात मिळत असल्‍याने मच्छीमारांच्या उत्‍पादनातही वाढ होण्याची शक्‍यता आहे.

लिलावातील दर प्रतिकिलो रुपयांत
मासे- पूर्वीचे - आताचे
बांगडा - ७०- १५०
सुरमई ३००- ८००

दीड महिन्यापासून समुद्रात चांगल्या पद्धतीने मासळी मिळत आहे. प्रत्येक फेरीला चार ते पाच टन माल येतो. बांगडा, सुरमई, कोळंबीला चांगला भाव येत आहे. शंभर टनापेक्षा अधिक मासळी मिळाल्‍याने दीड महिन्यात मासेमारी व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.
- जयेंद्र पेरेकर, मासळी व्यावसायिक

थंडीमध्ये बांगडा, ढोमा, मुशी कोळंबी अशा प्रकारची मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. लहान मच्छीमारांच्या तुलनेत मोठ्या बोटी असलेल्‍यांना मुबलक मासे मिळतात. मार्चपर्यंत मासळीचा हंगाम असाच सुरू राहील. मासळीचा हंगाम आहे. नंतर जवळा, आंबड या मासळीचा हंगाम सुरू होईल.
- नयन नाखवा, सचिव, माता टाकादेवी मच्छीमार संघ, मांडवा