कुडगांव ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार

कुडगांव ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार सरपंचासह तत्कालीन ग्रामसेवकांना चांगलाच भोवला आहे. या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे नीलेश पवार यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून प्राथमिक चौकशीत चार ग्रामसेवकांचे निलंबन, भ्रष्टाचाराची रक्कम सरपंचाकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे.
कुडगाव ग्रामपंचायतीमध्ये २००९ ते २०१६ या कालावधीतील झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांबाबतची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदार पवार यांनी केली होती. यात प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेले कुडगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक संजय श्रीवर्धनकर, रवींद्र सोनावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच त्यांच्यावर खातेअंतर्गत चौकशी बजावण्यात आली असून दोन वेतनवाढी कायम स्वरूपी थांबवण्यात आल्या आहेत.
तत्कालीन ग्रामसेवक अभिषेक मकू आणि एल. एच बेंडूक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तसेच त्यांच्यावर खातेअंतर्गत चौकशी बजावण्यात आली असून, अनुक्रमे एक वेतनवाढी कायमस्वरूपी थांबवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडून या प्रकरणात तत्कालीन सरपंच दगडू काविणकर आणि नागूबाई वाघमारे यांच्यावर भ्रष्टाचाराची रक्कम निश्चित करून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, विस्तार अधिकारी किशोर नागे आणि तत्कालीन विस्तार अधिकारी चिमाजी हंबीर यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही दिले गेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन कनिष्ठ सहायक कैलास चव्हाण, वरिष्ठ सहायक प्रसाद ठाकरे यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही दिले गेले आहेत. तसेच, तत्कालीन कनिष्ठ प्रशासन अधिकारी अंजली वर्तक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये ही सर्वात मोठी कारवाई असून अंतिम कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
---
कुडगाव ग्रामपंचायतीमध्ये प्राथमिक चौकशी करण्यात आली, त्यात ते दोषी आढळल्याने हे आदेश आहेत. पुढील चौकशी प्रक्रिया सुरू राहणार आहे. यात किती रुपयांची अफरातफर झालेली असेल हे सांगता येत नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com