निवारा केंद्रांसाठी १९७ कोटींचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवारा केंद्रांसाठी १९७ कोटींचा प्रस्ताव
निवारा केंद्रांसाठी १९७ कोटींचा प्रस्ताव

निवारा केंद्रांसाठी १९७ कोटींचा प्रस्ताव

sakal_logo
By

निवारा केंद्रांसाठी १९७ कोटींचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२० : चक्रीवादळे, महापूर, उधाण यांसारख्या नैसर्गिक आपत्तींत वाढ होत असल्‍याने नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी तात्पुरता निवारा शोधताना प्रशासनाची धावपळ होते. आपद्‌ग्रस्‍तांचे हाल दूर व्हावे, यासाठी रायगड जिल्ह्यात तीन ठिकाणी बहुद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निवारा केंद्रांसाठी १९७.०१ कोटींचा प्रस्ताव तयार केला असून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे.

जिल्ह्यात बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यास प्राधान्य दिले जात आहे. ही केंद्रे इतर वेळी व्यावसायिक कामांसाठी वापरली जातील. यातून या निवारा केंद्राच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होईल, तर आपत्तीच्या वेळेला केंद्रात आश्रय घेणाऱ्या व्यक्तींना अन्न, औषधे, निवास यासारख्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. ही केंद्रे मुख्य रस्त्यापासून जवळ असतील. आपत्तीकाळात नागरिकांना या केंद्रात तत्काळ स्थलांतरित करता येईल. स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, विश्रांतीगृह अशा सुविधांनी युक्‍त अशी तीन बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू आहे. यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी १४४.६१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापूर्वीही निवारा केंद्राच्या उभारणीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या; परंतु त्‍यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच भूसंपादन वेळेत न झाल्याने प्रस्‍ताव बारगळला. बहुद्देशीय निवारा केंद्राबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात आपद्ग्रस्तांना आश्रय घेता यावा, यासाठी दरडग्रस्त गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची डागडुजी करण्यात येणार आहे.


बहुद्देशीय निवारा केंद्र
श्रीवर्धन - ६ कोटी १० लाख
महाड - ३कोटी ७ लाख
मुरूड - ४१कोटी ५० लाख
शाळांमधील शेड - ८२ लाख
दरडग्रस्त गावांसाठी - ९१ लाख
भूसंपादन निधी- १४४ कोटी६१ लाख


नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी टाळण्याकडे सर्वाधिक लक्ष दिले जात आहे. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात नागरिकांचे स्थलांतर वेळेत केल्‍याने जीवितहानी टाळण्यात मदत झाली होती. अचानक येणाऱ्या आपत्तीकाळात आश्रयासाठी वापरण्यात येणाऱ्या इमारती तितक्याच मजबूत आणि सोयीने युक्त असाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी आराखडा तयार केला असून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-, रायगड