होळी करा लहान, पोळी करा दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळी करा लहान, पोळी करा दान
होळी करा लहान, पोळी करा दान

होळी करा लहान, पोळी करा दान

sakal_logo
By

अमित गवळे, पाली
दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्‍ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा, सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरणपूरक साजरा करावा, उत्‍सवकाळात ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ असे आवाहन जिल्‍ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी ठिकठिकाणी होळीत नैवेद्य म्हणून जाळल्या जाणाऱ्या हजारो पोळ्या गोरगरिबांना वाटून त्यांची होळी आनंददायी करण्याचा अंनिसचा प्रयत्‍न असतो.
होळी म्हटले की वृक्ष तोड ही संकल्पना रायगड जिल्ह्यात बदलताना दिसते आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पर्यावरणस्नेही होळी व धुळवड साजरी होत आहे. यंदा वन व महसूल विभाग, गाव व शहरातील काही संस्‍था व पर्यावरण मित्र, विविध सामाजिक संस्था-संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक व पर्यावरणस्नेही होळी आणि धुळवड साजरी करण्यासाठी व्यापक जनजागृती व प्रबोधन करण्यात येत आहे. याबरोबरच अनेक शाळा व महाविद्यालयात देखील पर्यावरणस्नेही होळी व धुळवड साजरी केली जात असल्‍याचे अंनिसचे जिल्हा पदाधिकारी अमित निंबाळकर यांनी सांगितले. गतवर्षी पालीतील एका सामाजिक संस्‍थेच्या मदतीने अंनिसकडून लगतच्या आदिवासी वाडीवर एक हजारांहून अधिक पोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. याशिवाय पेण, नागोठणे, खोपोली, अलिबाग आदी ठिकाणच्या अंनिस शाखा तसेच जिल्ह्यातील इतरही मंडळांनी तर कोणी वैयक्तिकरित्या हजारो पोळ्या जमा करून आदिवासी वाड्यांवर वाटप केले.

गोरगरीबांची होळी गोड
होळीत पुरणपोळी टाकण्याऐवजी ती बाजूला काढून ठेवा, कोरडी राहील असे पहा, एका कोरड्या खोक्यात, डब्यात गोळा करा. आणि गावातील कोणत्याही अंनिस कार्यकर्त्याला आणून द्या. त्या पोळ्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी गरीब वस्त्यांवर व आदिवासी वाड्यापाड्यांवर जाऊन कार्यकर्ते वाटप करतात. ‘पोळी वाटणे’ हा उपक्रम कोणीही एखादी गरीब वस्ती निवडून त्यांच्या पातळीवर करू शकतो असे आवाहन अंनिसचे रायगड शाखेचे कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी केले.

झाड लावा, घरपट्टीचे पैसे मिळवा
होळीला झाडे न तोडण्याचे आवाहन हभप महेश पोंगडे महाराज आणि अनेक संस्था संघटनांनी सोशल मीडियावर केले आहे. होळीला वृक्ष लागवड करून जो कोणी त्‍याचे वर्षभर संगोपन करेल, त्‍याची घरपट्टी आपण भरणार असल्‍याचे आवाहन सुधागड तालुक्यातील पोंगडे महाराज यांनी केले आहे.

पर्यावरण पूरक होळी
परंपरा जपत पर्यावरणपूरक होळी साजरा करण्याचे आवाहन गणराज व डॉ. अर्चना जैन हे दाम्‍पत्य अनेक वर्षे करीत आहेत. होळीची उंची मोठी करण्यापेक्षा सुकी लागडे, गवत, पेंढ्याचा वापर करून छोटी होळी उभारा, यासाठी ते जनजागृती करीत आहेत.


वांगणी गावात पर्यावरणस्नेही होळी
होळी म्हणजे वृक्षतोड या गैरसमजाला फाटा देत, रोह्यातील वांगणी गावातील ग्रामस्थ ११ वर्षांपासून एकही जिवंत व हिरवे झाड न तोडता होळी साजरी करत आहेत. त्यासाठी होळीच्या चार-पाच दिवस अगोदरच गावात दवंडी पिटून होळीसाठी झाडे न तोडण्यासाठी जनजागृती केली जाते. नैसर्गिकरित्या, वादळात पडलेली, वाळलेली झाडे थोड्या प्रमाणात वापरून प्रतिकात्मक होळी उत्साहात साजरी केली जाते.

होळी म्हणजे वृक्षतोड या समीकरणाला विराम देऊन वृक्षसंवर्धनाचा एक सकारात्मक संदेश वांगणी तसेच जिल्ह्यातील असंख्य ग्रामस्थ आपल्या कृतीतून सर्वांना देत आहेत. वांगणी ग्रामस्थांच्या कृतीचे व निर्णयाचे अनुकरण गावागावांत झाल्यास दरवर्षी होळीच्या निमित्ताने होणारी वृक्षांची बेसुमार कत्तल थांबेल व आपली वसुंधरा पुन्हा हिरवीगार होईल.
- टिळक खाडे, विज्ञान शिक्षक, वांगणी