पालीत आदिवासी, गरिबांची होळी झाली गोड

पालीत आदिवासी, गरिबांची होळी झाली गोड

पाली, ता. ७ (वार्ताहर) : महाराष्ट्र अंनिसने ‘होळी करू लहान, पोळी करू दान’ असे आवाहन केले होते. त्यानुसार पालीतील एक संघर्ष समाजसेवेसाठी ग्रुप व अंनिस पाली-सुधागड शाखेच्या वतीने जवळपास १६००हून अधिक पुरणपोळ्या संकलित करण्यात आल्या. या पुरणपोळ्या आदिवासी वाड्या व आश्रमशाळेत वाटून गोरगरिबांची होळी गोड करण्यात आली. यंदाही या आवाहनाला अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘होळी लहान करू या, पोळी दान करू या’ या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळणे व पर्यावरणाचे प्रदूषण थांबवणे हा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी अंनिस पदाधिकारी अमित निंबाळकर व रोशन रुईकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत ठोंबरे या तरुणांनी होळीच्या रात्री सोमवारी (ता. ६) पालीतील सर्व होळ्यांवर जाऊन कागदी खोके वाटले. त्यामध्ये लोकांनी व्यवस्थित पोळ्या संकलित केल्या. ठिकठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येवून पोळ्या आणून दिल्या. त्यामुळे होळीत जाणाऱ्या शेकडो पोळ्या गरिबांच्या मुखी लागल्या. ‘सकाळ’नेही बातम्यांच्या माध्यमातून ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हे आवाहन केले होते. तालुक्यातील गोमारी व झापवाडी या आदिवासी वाड्या व वावळोली आश्रमशाळा येथे या पोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर येथील बच्चेकंपनी व तरुणांसोबत पर्यावरणस्नेही धूलिवंदन साजरे करण्यात आले.

आपण घरात सण उत्सव आनंदात साजरे करतो; परंतु गावापासून दूर आदिवासीवाड्यावर अजून मूलभूत सोयी सुविधा नाहीत. त्यांना अंगभर कपडे आणि खायला नाही, तर सणासुदीला गोडधोड तरी कुठून येणार. म्हणूनच आपला आनंद गरिबांना मदत करून साजरा केला पाहिजे.
- श्रीकांत ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com