
यात्रांच्या नव्या हंगामाचे बिगुल
अलिबाग, ता. ८ (बातमीदार)ः जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्सव, जयंती, यात्रांचा नवा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. महाजनाई देवीच्या उत्सवापासून रामनवमी, हनुमान जयंतीपासून सुरू झालेला हा उत्साह अगदी एप्रिल महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर गावागावांतील मंदिरे, घरे रंगवण्याचे काम जोमाने सुरू झाले असून तरुणांना रोजगाराचे नवे साधन खुले झाले आहे.
एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यात उत्सव, जयंती, यात्रांचा हंगाम सुरू असतो. यात पालखी तसेच उत्सवाची तयारी काही ठिकाणी पूर्ण झाली आहे; तर काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. यानिमित्ताने मुंबई, पुणे, बोरिवली येथे कामानिमित्त असलेले ग्रामस्थ पालख्यांसाठी गावात येतात. मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये महामारी व महाजनाई देवीचा उत्सव आहे. त्यानंतर आंदोशीमध्ये उत्सव पालखी मिरवणूक होणार आहे. २२ मार्च रोजी जिल्ह्यात २१ ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, मिरवणुका काढण्यात येणार आहेत. ३० मार्च रोजी रामनवमीचा उत्साह पाहावयास मिळणार आहे. यानिमित्त ९९ ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत; तर ४ एप्रिल रोजी महावीर जयंती, ६ एप्रिलला हनुमान जयंती तसेच १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे.
---------------------------------------------
नियोजनामध्ये तरुणाई आघाडीवर
१६ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात सुमारे ४५० पेक्षा अधिक ठिकाणी यात्रा, उत्सव मिरवणुका काढण्यात येणार आहेत. तसेच काही गावांमध्ये वेगवेगळ्या देवतांचे उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये मंदिरे रंगवण्याच्या कामांबरोबरच घरांनादेखील रंगकाम केले जात आहे. या सोहळ्यांमधील तरुणाईचा उत्साह अधिक महत्त्वपूर्ण आहे.
ः--------------------------------
पूर्वी यात्रा, उत्सव, जयंतीच्या निमित्ताने मंदिरे, घरे रंगवण्यासाठी बाहेरून कारागीर बोलवावे लागत होते, परंतु वाढत्या बेरोजगारीमुळे गावातील तरुणांनी रंगकामाची कला आत्मसात केली आहे. त्याचा परिणाम जयंती, उत्सव, यात्रांमुळे तरुणांना रोजगाराचा नवा पर्याय उपलब्ध होत आहे. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत कामाची बेगमी झालेली आहे.
- जयवंत औचटकर, कामगार