
सुधागडात प्राचीन लेण्यांचा वैशिष्टयपूर्ण ठेवा इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती
मनःशांतीचे सुधागड केंद्र
अमित गवळे ः पाली
सुधागड तालुक्यात प्राचीन व भव्य लेण्यांचे समूह आढळतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन बौद्धकालीन लेण्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणींमुळे प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष मिळत आहे. त्यामुळे या वास्तू इतिहास अभ्यासकांसह देश-विदेशातील पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत.
--------------------------------------------
ठाणाळे लेणी
- ठाणाळे लेणी समूहात चैत्यगृह, स्मारक,-स्तुपसमूह, सभागृह व उर्वरित २१ विहार लेणी आहेत. बहुतांश विहारांमध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून त्यामध्ये शयनासाठी ओटे आहेत. काही विहारांमध्ये समोरच्या भागात दालन व चारपाच भिक्षूंच्या निवासाची व्यवस्था आहे. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. पाच पायऱ्या असलेल्या एका विहारात वाकाटकालीन रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात. प्राकृत ब्राह्मी लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके आहे.
- ठाणाळे लेण्याचा काळ हा इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून इ.स. ५ व्या शतकापर्यंत आहे. ही लेणी डोंगरामध्ये पश्चिमाभिमुख कोरलेली आहेत. लेण्यात सापडलेल्या विविध वस्तू व मौर्यकालीन चांदीची नाणी पाहता ही लेणी २२०० वर्षांपूर्वीची असल्याचे अनुमान काढण्यात येतो. शिल्पकलेच्या दृष्टीने अप्रतिम असलेल्या तसेच मानवी जीवनाच्या आर्थिक जडणघडणीत या लेण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही लेणी समुद्र किनाऱ्यावरून चौल- धरमतर- नागोठणे खाडीमार्गे देशावर जाणारी व्यापारी केंद्रे होते.
------------------------------------------
नेणवली, चांभार लेणी
- अतिशय दुर्गम असलेल्या या लेणीसमूहात एकूण २१ लेण्या आहेत. काही लोक पूर्वापार या लेण्यांना पांडवलेणी म्हणूनच संबोधतात. लेण्यांतील सर्वांत मोठ्या सभागृहाच्या मागच्या बाजूस उंच व मोठा घुमट आहे. घुमट दगडांमध्ये व्यवस्थित कोरला आहे. घुमटाचा व्यास १.५ मीटर, उंची ३.५ मीटर आहे. घुमटाच्या अगदी वर मध्यभागी झाकणासारखा आकार असून चौरसाकृती छिद्र आहे. स्थानिक लोक या घुमटाला रांजण म्हणतात. या लेण्यांतील सभागृह सर्वांत मोठे लेणे आहे. याचा दर्शनी भाग कोसळला असला तरी छत सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो.
- लेण्यांमध्ये काही ठिकाणी भिंतीस लागून शयन कोठे बांधले आहेत. भिंतीमध्ये कोनाडे ठेवण्यात आले आहेत. लेणी समूहात एकूण अकरा लेणी असली तरी मुख्य सभागृह व त्याच्या बाजूकडील सदनिका वगळता काही ठिकाणी लेणी कोसळली आहेत. याच लेण्यांच्या पश्चिम बाजूस अर्धा किलोमीटर अंतरावर चांभार लेणी आहेत, परंतु येथील डोंगराचे कडे तुटल्याने येथे जाता येत नाही. या लेणी समूहाचा उपयोग चौल बंदरातून नागोठणे मार्गे मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गासाठी केलेला आहे. ही प्राचीन लेणी १८८९ पर्यंत जगात अपरिचित होती, परंतु १८९० मध्ये रेव्हरंड ॲबंट यांनी लेण्यांचा प्रथम शोध लावला.
------------------------
गोमाशी लेणी
गोमाशी येथे बौद्ध लेणी समूह आहे. त्याला काही लोक भृगु ऋषींची लेणीदेखील संबोधतात. गोमाशी गावाजवळ सरस्वती नदीकाठी खोंडा नावाचा डोंगर आह. या डोंगरातील एका घळीत १.५ मीटर उंचीची गौतम बुद्धांची प्रतिमा कोरण्यात आली आहे. कोणी याला भृगु ऋषींची मूर्ती म्हणते. हे ठिकाण म्हणजे नागोठणे खाडीमार्गे ताम्हणी घाटात मावळात जाणाऱ्या मार्गावरील एक लेणे आहे. या लेण्यांकडे जायचे असेल तर पालीपासून गोमाशी अंतर १४ किमी आहे. गोमाशी गावापर्यंत एसटीची सोय आहे. या लेण्यांमध्येदेखील मोठी पडझड झाली आहे. लेण्यांपर्यंत जाणाऱ्या मार्गाचीदेखील दुरवस्था झाली आहे.