मियावाकी जंगल साकारण्याला पसंती

मियावाकी जंगल साकारण्याला पसंती

अमित गवळे, पाली
कमी जागेत देशी-विदेशी व स्थानिक झाडांच्या लागवडीतून घनदाट मानवनिर्मित जंगलांच्या निर्मितीसाठी अनेक पर्यावरण प्रेमी व विकासक रायगड जिल्ह्यात प्रयत्नशील आहेत. यासाठी मियावाकी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यामुळे पशू-पक्षांना अन्न-निवारा मिळत असून जैवविविधतेत वाढ होत आहे.
सुधागड तालुक्यातील कुंभारघर येथील राजीव खन्ना यांनी आपल्या शेतातील जागेवर नुकतेच मियावाकी पद्धतीचा वापर करून अशा प्रकारे स्थानिक व देशी वृक्ष लागवड करून जंगल तयार केले आहे. जवळपास ३० गुंठ्यामध्ये ३००० झाडे लावली आहेत. तालुक्यातील वनस्पती अभ्यासक, बाग निर्माते अमित निंबाळकर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जपानमधील वनस्पती तज्‍ज्ञ प्रा. मियावाकी यांनी वृक्ष लागवडीच्या या नव्या पद्धतीचा आविष्कार केला. मानवनिर्मित जंगल पद्धतीला मियावाकी संबोधले जाते. यामध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी व स्थानिक वृक्षांची लागवड केली जाते. या तंत्रज्ञानात निसर्गाबरोबरच विज्ञानही आढळते. जंगल घरांच्या मागे, मंदिर परिसर, शाळा, महाविद्यालये, उद्योगसमूहांच्या जागा तसेच रस्त्यांच्या दुतर्फा मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करता येते.

कमी जागेत अनेक झाडे
साधारण एक हजार चौरस फूट जागेत २५० मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या ४० पेक्षाही जास्त देशी पण दुर्मिळ झाडांची योग्य अंतरावर लागवड केली जाते. ज्यामध्ये विविध प्रकारची झाडे एकाच ठिकाणी आढळतात.

देशी वृक्षांना स्थान
वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातीची त्यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मुलद्रव्यांची देवाणघेवाण यास महत्त्व आहे. मियावाकी पद्धतीत विदेशी वृक्षांना स्थान नसते. तर स्थानिक वृक्षांची रोपे लावली जातात. सर्व तंत्रज्ञान जमिनीखालील उपयोगी जिवाणू, खेळती हवा, शेणखत आणि भाताच्या तुसावर अवलंबून असते.

सेंद्रिय घटकांचा वापर
जागेवरील मूळ माती तीन फूट खोल खड्डा करून काढली जाते आणि पुन्हा तेथील चाळलेली माती, खत आणि भाताचे तूस यांचे मिश्रण करून भरली जाते. ही संपूर्ण जैविक पद्धती असून सेंद्रिय घटकांचाच वापर होतो. रासायनिक खते, कीटकनाशकापासून हे तंत्रज्ञान मुक्त असते. मियावाकीस योग्य कुंपण घालून पहिली दोन वर्षे सांभाळल्यास तिसऱ्या वर्षी ही उद्याने स्वतंत्र आणि स्थिर होतात.

दाट जंगल फार कमी राहिल्‍याने पशू-पक्षी जास्त फिरकत नाहीत आणि जमिनीची धूप वाढली आहे. मियावाकी लागवड पद्धत एकदम सोपी असल्याने तशी लागवड करण्याचा निर्णय घेतला.
- राजीव खन्ना, विकसक, कुंभारघर, सुधागड

जिल्ह्यात अनेकजण आपल्या परसात, शेतातील मोकळ्या जागेत, माळावर या पद्धतीचा अवलंब करतात. पर्यावरण संवर्धन व जैवविविधता टिकविण्यासाठी व मृदा संवर्धनासाठी या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे अनेकांना या पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला देतो.
- अमित निंबाळकर, वनस्पती-बागकाम तज्‍ज्ञ, पाली

पाली ः मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली होती.

..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com