महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण बहरले

महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण बहरले

महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण बहरले
महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण किंवा तामणाला सध्या बहर आला आहे. जिल्ह्यात वनपट्टा, माळरानावर व रस्त्याच्या कडेला वाहत्या पाण्यालगत जांभळ्या फुलांनी झाडे सध्या बहरलेली दिसत आहेत. रानावनातील ताम्‍हणाची फुले सध्या स्‍थानिकांसह पर्यटकांचे लक्ष वेधून धेत आहेत.
ताम्हण किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित आहे. कोकणात या वृक्षाला ‘मोठा बोंडारा’ असे म्हणतात. मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंडातील जंगलांत प्रामुख्याने पानगळीच्या जंगलात, नदीनाल्याच्या काठावर दिसतो. साधारण एप्रिल ते मे मध्ये फुलांना बहर येत असल्‍याने त्‍याला महाराष्ट्राचे राज्यपुष्‍प संबोधले जाते. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात. रस्त्यालगत सावलीसाठीही या वृक्षाची लागवड केली जाते.

फुलांचे वैशिष्ट्ये
फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती सुंदर असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे नाजूक पुंकेसर असतात. फुलांची रंगछटा जमीन, पाणी, हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते.

लाकूड उपयुक्त
तामण झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीव काम करता येते. समुद्राच्या खार्‍या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतही नाही. त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी त्‍यांचा वापर केला जातो. इमारत, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी तामणाच्या लाकडाचा उपयोग होतो. झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो.

ताम्हण हे महाराष्‍ट्राचे राज्यफुल आहे, या बद्दल अनेकांना माहिती नाही. त्यामुळे शाळांमधून या संदर्भात अधिक माहिती देणे व जागृती करणे आवश्यक आहे. झाडांची वाढ लवकर व जोमाने होते. बियांपासून सहज रोपे तयार करता येतात. यामध्ये जांभळा, पांढरा आणि गुलाबी फुले येणाऱ्या झाडाच्या तीन प्रजाती आहेत. खुरटे म्हणजे कमी उंचीचे झाड उद्यान व बागेत लावले जाते.
- राम मुंडे, वनस्पती अभ्यासक, विळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com