वाडीवस्तीवर शिक्षणाचा जागर

वाडीवस्तीवर शिक्षणाचा जागर

अमित गवळे, पाली
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी सुधागड तालुक्यातील पडसरे येथील आश्रमशाळा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सुधागडसह पेण, रोहा, खालापूर, कर्जत व अलिबाग आदी तालुक्यातील वाड्या वस्त्या पिंजून काढत आहेत. एकेक विद्यार्थी व त्याच्या पालकांना भेटून शिक्षणाचे महत्त्व पटविले देत पात्र मुलांना मोफत प्रवेश दिला जात आहे.
आदिवासी समाजातील मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावीत, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, सर्व सोयी सुविधांयुक्त शाळेत ज्ञानार्जन व्हावे, पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व कळावे आणि लग्न, स्थलांतर आदींमुळे शिक्षणात खंड पडू नये, यासाठी वाडी-वस्‍तीवर शोधमोहीम राबविली जात आहे. कोणतीही सुटी न घेता उन्हातान्हाची व दुर्गम भागाची पर्वा न करता वाडीवस्तीवर जाऊन कर्मचारी गृहभेटी घेत असल्‍याची माहिती आश्रमशाळेतील शिक्षक राजू मोरे यांनी दिली.
संस्था अध्यक्ष रवींद्र लिमये व मुख्याध्यापक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. पडसरे आश्रमशाळा ही सर्व सोईसुविधांनीयुक्त आयएसओ मानांकित आहे. सद्यःस्थितीत येथे सुधागड, पेण, खालापूर, रोहा व अलिबाग या पाच तालुक्यातील एकूण ५२ आदिवासी वाड्या-पाड्यांतील पहिली ते दहावीपर्यंतची ४४८ मुले मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत.


पथक तैनात
वाडी-वस्त्यांपर्यंत जाण्यासाठी शिक्षक, अधीक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची चार पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकाला एक पथक प्रमुख नेमून दोन टप्प्यात प्रवेश भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पहिला टप्पा शनिवार (ता.२९) असा असून दुसरा टप्पा मंगळवार (२-४ मे) असा असेल.

लग्नसोहळ्यात जागर
सध्या ठिकठिकाणी लग्नसराई सुरू आहे. अशा ठिकाणी देखील भेट देऊन उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. याशिवाय पूजा किंवा इतर कार्यक्रम, बस स्थानक आदी मिळेल त्या ठिकाणी शिक्षणाबाबत जनजागृती करून मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले जात आहे.

अध्ययन पूर्ण होण्यासाठी
प्रत्यक्ष गृहभेटी देण्यामागचा उद्देश असा की, पालकांकडे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले असले तरी पालक लवकर शाळेत प्रवेश घेत नाहीत. शिक्षणाचा हक्क २००९ नुसार, ऑनलाईन नोंदणी करताना प्रत्यक्ष आधार कार्डवरील जन्मतारखेनुसारच त्या मुलाची इयत्ता ग्राह्य धरली जाते. परिणामी पालकांच्या अज्ञानामुळे उशिरा प्रवेश घेतल्याने विद्यार्थी वयानुरूप पुढील इयत्तेत प्रवेशास पात्र ठरतो आणि तयाची मागच्या इयत्तेतील पाटी कोरीच राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com