दरडग्रस्त गावे होणार सुरक्षित

दरडग्रस्त गावे होणार सुरक्षित

दरडग्रस्‍त गावे होणार सुरक्षित
पावसाचा सूक्ष्म निरीक्षणासाठी स्‍वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : मान्सूनमध्ये दरडीसारख्या ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून जिल्ह्यातील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयार केली आहे. पावसाचे सूक्ष्म निरीक्षण करता यावे यासाठी प्रत्येक महसूल मंडळस्तरावर कृषी विभागाकडून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्याच्या सूचना (जीएसआय) भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केल्या आहेत. जिल्ह्यात ८२ महसूल मंडळ असून यातील फक्त ५ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र सुरू झाली आहेत, उर्वरित १७ ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण योजनांमधून महाड तालुक्यात सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात एकूण २६ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात येत आहे. यासाठी १३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
पूर, चक्रीवादळे, दरडी कोसळणे यावर मात करण्यासाठी आधुनिक यंत्रणा वापरली जाणार असून उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांमध्ये दरवर्षी वाढ होत असून १५ वर्षांत १०३ वरून ही संख्या २११ वर गेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्तींचा मान्सूनपूर्व आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व अधिकाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थित होते. यात विशेषतः दरडी कोसळू नये, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. रायगड जिल्ह्यात
दरडीमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अन्य नैसर्गिक आपत्तींपेक्षा सर्वाधिक आहे. याशिवाय दरडी कोसळून रहदारी विस्कळित होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. दरडी कोसळण्यानंतर मदतकार्य राबवण्यापेक्षा आपत्ती येण्यापूर्वी उपाययोजना केल्यास होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासन गांभिर्याने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे स्‍पष्‍ट केले. दरडग्रस्त गावातील नागरिकांचे निरिक्षण, त्यावर तज्ज्ञांनी मांडलेली मते यांचा सखोल अभ्यास करुन यावर उपाययोजना केल्या जात आहेत.

धरणांमुळे पुराचा धोका असलेली गावे
मुरूड - भोईघर, मांडला, बोर्ली
तळा - वावा, राणेची वाडी, खैराट, बामणघर, अंबेशी
पेण - आंबेघर
अलिबाग - श्रीगाव,
सुधागड - नवघर, कोंडगाव, पेडली, घोटवडे, परली, केवळे, उद्धर, उन्हेरे
श्रीवर्धन - बोर्ली पंचतन, गोंडघर, वडवली, कुडकी
म्हसळा - बौध्दवाडी, विठ्ठलवाडी, पाभरेगाव, संदेरी, फळसप
महाड - वरंझ, बारसघर, शिरवली, पांगारी, वरंडोली, नांदगाव, वलंग, जुई, सोनघर, खैरे
पनवेल - सावणे, जांभिवली, देवलोली

दरडींमुळे वाहतूक विस्कळित
कशेडी घाट - पोलादपूर
कार्लेखिंड - अलिबाग
ताम्हाणी घाट - माणगाव
आंबेनळी घाट - पोलादपूर
अंडा पॉइंट - खालापूर
भिसे खिंड - रोहा
सुकेळीखिंड - रोहा

दरडी रोखण्यासाठी जीएसआयच्या शिफारशी
- दरडप्रवण भागात पर्जन्यमापक यंत्र बसविणे, ज्यामुळे अतिवृष्टीचा अंदाज घेऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे शक्य होईल
- दरडग्रस्त गावांमध्ये होणाऱ्या बांधकांमाबाबत जनजागृती करणे
- विविध जैविक वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देणे
- तीव्र उतारावरील गावांमध्ये संरक्षण भिंत बांधणे

दरड कोसळून झालेल्या दुर्घटना
दासगाव - ४८
कोंडीवते - ३३
जुई बु. - ९४
रोहण - १५
कोतवाल - ९
लोयर चव्हाणवाडी - ३
जुलै - २०२१
तळिये - ८७
साखर सुतारवाडी - ६
केवनाळे- ५


दरडग्रस्त गावे (जीएसआच्या रिपोर्टनुसार)
तालुका/ दरडप्रवण गावे/ सर्व्हे झालेली / सर्व्हे न झालेली
अलिबाग/ ६/२/४
मुरुड /६/१/५
पेण / १०/०/१०
पनवेल / ३/३/०
उरण /१/१/०
कर्जत/४/३/१
खालापूर / ८/४/४
रोहा / १६/१६/०
सुधागड / ३/३/०
माणगाव / ७/५/२
तळा / ०/०/०
श्रीवर्धन / ७/३/४
म्हसळा / ६/६/०
महाड / ७५/४९/२६
पोलादपूर / ५९/४९/१०
एकूण/२११/१४५/६६


अतिवृष्टीमध्ये जमीन नरम होत असल्याने तीव्र उतारावरील माती खाली घसरते. सह्याद्रीच्या पट्ट्यात दरडींचे प्रमाण वाढले आहे, त्यास वृक्षतोड, माती उत्खनन आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता डोंगर-उतारावर बांधलेली घरे आदी कारणीभूत आहेत. अशा परिस्थितीतही दरडींपासून होणारे नुकसान कमी करणे शक्य आहे. दरड कोसळण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. या संकेतांची कल्पना स्‍थानिक नागरिकांना सर्वप्रथम येते. यासाठी दरडप्रवण गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे होणारी जीवित, वित्त हानी कमी करता येणे शक्य आहे.
- प्रा. डॉ. सतीश ठिगळे
निवृत्त विभागप्रमुख, भूशास्त्र विभाग-सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com