‘सेतू’चे सर्व्हर डाऊन,

‘सेतू’चे सर्व्हर डाऊन,

पाली, ता. १० (वार्ताहर) : मागील काही दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रांतील सर्व्हर डाऊन आहे. परिणामी इथे विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. बऱ्याच कालावधीपासून तांत्रिक समस्या येत असतानाही यंत्रणेत अद्याप सुधारणा न झाल्याने नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सध्या शाळा-कॉलेजांच्या प्रवेशाची लगबग सुरू असतानाच झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे सुधागड तालुक्यासह जिल्हाभर गोंधळाची स्थिती आहे.

सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून एका छताखाली सर्व सुविधा नागरिकांना मिळतात. डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी सेवा या केंद्रांद्वारे दिल्या जातात. या सेवा केंद्रांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. नेहमी या केंद्रावर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून सुधागड तालुक्यासह जिल्हाभरातील सेतू सुविधा केंद्रात सर्व्हर डाऊन असल्याने कर्मचाऱ्यांबरोबरच या केंद्रात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने प्रमाणपत्र किंवा दाखला देण्यात अडचणी येत आहेत. एक प्रमाणपत्र किंवा दाखला घेण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने लांबच लांब रागा लागत आहेत. परिणामी या केंद्रांवर गोंधळाचे वातावरण आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांची गैरसोय होत असताना, सुविधा केंद्रांतील अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. सध्या शाळा-कॉलेजांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. कॉलेजच्या प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र, इतर दाखले लागतात. सेतू केंद्रातील तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना हे दाखले मिळवताना मनस्ताप होत आहे.


पोचपावती कशी सादर करायची
विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र सादर करण्यास शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे; परंतु प्रवेशावेळी ते सादर न करू शकणाऱ्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सेतू केंद्रांवर सर्व्हर डाऊन असल्याने हे प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी अर्जच करू शकलेले नाहीत. त्यामुळे पोचपावती कशी सादर करायची, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.

--
महा-ई-सेवा तसेच सेतू केंद्रांसाठी महाआयटी अंतर्गत एकच क्लाऊड सर्व्हर आहे. या क्लाऊड सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात डाटा संचयित झाला आहे. परिणामी क्लाऊडमध्ये जागा (स्पेस) उपलब्ध नसल्याने जुना संचयित डाटा काढण्यात आला आहे. तसेच किरकोळ तांत्रिक बिघाड दुरुस्त करून सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे.
- राहुल सुर्वे, राज्य व्यवस्थापक, महाआयटी

उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी अनेक जण सेतू केंद्रांवर रोज हेलपाटे मारत आहेत, पण सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत आम्हाला परत पाठवले जात आहे. यांच्या निष्काळजीमुळे आमच्या मुलांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. याची जबाबदारी सरकार घेणार आहे का, सगळ्या सेतू केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे, पण याची दखल कोणीच घेत नाही, हे संतापजनक आहे.
- योगेश गिरी, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com