तिबोटी खंड्याचे आगमन

तिबोटी खंड्याचे आगमन

Published on

ज्वेल ऑफ कोकण


अमित गवळे, पाली
पावसाळा म्हणजे जिल्ह्यात काही पक्ष्यांचा विशिष्ट विणीचा हंगाम असतो. त्यात तिबोटी खंड्या आणि नवरंग पक्षी विशेष आहेत. रंगीबेरंगी पक्ष्यांच्या दुनियेत तिबोटी खंड्या हा कोकणरत्न, कलर बॉम्ब, उडता इंद्रधनुष्य अशा वेगवेगळ्या नावांनी पक्षीप्रेमींमध्ये प्रचलित आहे. हजारो किमीचा प्रवास करून तिबोटी खंड्या सध्या जिल्ह्यात दाखल झाला आहे.
पावसाळ्यात जंगलातील ओढ्याजवळ आढळणारा हा पाहण्यासाठी पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमींची सध्या लगबग सुरू आहे. गेल्‍या काही वर्षांपासून निसर्ग छायाचित्रकारांमध्ये तिबोटी खंड्याचे आकर्षण वाढले असून भारतभरातून पर्यटक फक्त तिबोटी खंड्याला पाहण्यासाठी पावसाळ्यात कोकणात येतात. पूर्वी चिपळूण, माणगावमध्ये हा पक्षी पाहण्यासाठी बरेच पर्यटक दाखल व्हायचे परंतु आता मुंबईनजीक कर्नाळा, पुण्यानजीक ताम्हिणी तसेच तळकोकणातील अनेक ठिकाणी तिबोटी खंड्या निरीक्षणासाठी स्थानिक तरुण इको टुरिझम उपक्रम राबवतात. त्यामधून अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

रायगड जिल्ह्याचा पक्षी
तिबोटी खंड्याच्या सुंदर दिसण्यामुळे आणि विशिष्ट जीवनशैलीमुळे याला ‘रायगड जिल्ह्याचा पक्षी’ म्हणून बहुमान मिळाला आहे. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पावसाच्या आगमनाची आतुरता असते, तशीच आतुरता पक्षीप्रेमी, पक्षीनिरीक्षक व छायाचित्रकारांना परदेशी पाहुणा ‘तिबोटी खंड्या’ची असते.

सप्तरंगी पक्षी
पायाला तीन बोटे असल्यामुळे त्याला ‘तिबोटी’ खंड्या असे म्हटले जाते. खंड्या पक्षी प्रजातींमधील भारतात आढळून येणार हा सर्वात छोटा पक्षी असून त्याचा आकार १४ सेमी इतकाच असतो. चमकदार गुलाबी, लाल, शेंदरी, पांढरा, निळा, काळा, आणि पिवळा अशा सप्तरंगानी नटलेला हा पक्षी जंगलातील छोटे ओहोळ, नदी-नाले यांच्याजवळ गर्द झाडीत दिसून येतो आणि जेव्हा कोणाची चाहूल लागते तेव्हा तिबोटी खंड्या शीळ मारत एवढ्या वेगाने उडत जातो की, पाहणाऱ्याला जणूकाही गर्द झाडीमधून इंद्रधनुष्य उडत असल्याचा भास होतो.

पिल्लांचे संगोपन
नर व मादी दोघेही आलटून -पालटून अंडी उबवतता. जवळपास १८-२१ दिवसांनंतर अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. पिल्लांना खाद्य भरवण्यासाठी नर आणि मादी सतत चोचीमध्ये छोटे खेकडे, पाली-सरडे, सापसुरूळी (चोपई), छोटे बेडूक, चतूर आणि इतर छोटे-छोटे किटक आणतात. पिल्लांचे संगोपन नर व मादी दोघेही मिळून करतात.

निसर्गाचे वरदान
तिबोटी खंड्याला निसर्गाने एक विशेष देणगी आहे, जर काही कारणास्तव पावसाळी एका हंगामातील या पक्षाचे घरटे मोडले किंवा त्या ठिकाणी कोणतीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास दुसऱ्या जागेवर नवीन घरटे बनवतात. एका हंगामात अधिकतम दोन वेळा पिलांचे संगोपन तिबोटी खंड्या करू शकतात आणि एका वेळेला ३-४ पिल्ले घरातून बाहेर येतात. त्यामुळे कोकणात यांची संख्या चांगलीच वाढली आहे. मात्र दिवसेंदिवस त्‍याच्या अधिवासाचा कालावधी कमी होत असून ही पक्षीअभ्‍यासक चिंतित आहेत.

उन्हाळ्याच्या अखेरीस तिबोटी खंड्या दक्षिण भारतातून अगदी श्रीलंकेपासून विणीच्या हंगामासाठी कोकणात यायला सुरुवात होते. तिबोटी खंड्या जून ते सप्टेंबर हा कालावधी कोकणात असतो त्यानंतर पिलांचे संगोपन करून पुन्हा पिलांसोबत दक्षिणेकडे स्थलांतर करतो. त्यातील काही पक्षी अनुकूल परिस्थितीत वर्षभर मुबलक पाणी असलेल्या परिसरात राहणे पसंत करतात. स्थलांतर करण्याचे टाळतात.
- शंतनू कुवेसकर, पर्यावरण अभ्यासक, माणगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.