सरसगडाचा पायथा वृक्षराजीने बहरला

सरसगडाचा पायथा वृक्षराजीने बहरला

सरसगडाचा पायथा वृक्षराजीने बहरला
पाली, ता. ११ (वार्ताहर) ः पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सरकारकडून वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे. यासाठी शाळा-महाविद्यालये, सरकारी-सामाजिक संस्‍थांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या पावसाने जोर धरल्‍याने जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यात वृक्ष लागवडीचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. नुकतीच सरसगडाच्या पायथ्‍याशी शेकडो विविध रोपांची लागवड करण्यात आली.
सरसगड परिसरातील वनराई नष्ट होत आहे. पर्यावरण संतुलनासाठी तसेच दरडींचा धोका टाळण्यासाठी डोंगरदऱ्यांमध्ये वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. हाच उद्देश ठेवून सुधागड तालुका मराठा समाज संस्था वृक्षरोपण व दुर्गसंवर्धन समितीच्या वतीने व सुधागड-पाली वनविभागाच्या सहकार्याने शेकडो रोपे लावण्यात आली. जागेचे महत्त्व लक्षात घेत झाडे लावली असून त्‍यांच्या संवर्धनाची जबाबदारीही संस्‍थेने घेतली आहे.
वृक्ष लागवडीमुळे जमिनीची धूप होणार नाही, गडावर नैसर्गिक संकट आले तरी मुळांमुळे माती तग धरेल आणि दरडीचा धोका टळेल. शिवाय विविध वृक्षांमुळे गड परिसरातील जैवविविधता बहरेल, पशुपक्ष्यांचे आश्रयासाठी होणारे स्‍थलांतर थांबेल. या उपक्रमात वनक्षेत्रपाल विकास तरसे, मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर, सरचिटणीस जीवन साजेकर, वृक्षारोपण व दुर्ग समिती अध्यक्ष अरविंद दंत, संचालक ॲड. नितीन शेवाळे आदी सहभागी झाले होते.

सुधागड तालुका मराठा समाजाने अतिशय स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास वनविभाग सर्वतोपरी सहकार्य करेल. पावसाळ्यात अधिकाधिक वृक्ष लागवडीचा संकल्‍प आहे.
- विकास तरसे, वनक्षेत्रपाल, पाली- सुधागड

ग्‍लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढीची समस्‍या उद्‌भवली आहे. यावर मात करण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड होणे आवश्‍यक आहे. प्रत्येकाने आपल्‍या वाढदिवस झाडे लावून साजरा करण्याचा संकल्‍प करावा. सुधागड तालुक्यातील सर्व गावातील रस्त्यालगत वृक्षारोपण व त्‍यांचे संवर्धन समाज बांधवांनी करावे.
- धनंजय साजेकर, अध्यक्ष, सुधागड तालुका मराठा समाज

पालीः सरसगडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले.

....................

निवी-तळाघर मार्ग हिरवेगार करण्याचा संकल्‍प
रोहा, ता. ११ (बातमीदार) ः आसपासच्या परिसरातील उजाड जागेवर जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या निश्चय करू या. यात अधिकाधिक औषधी वनस्पतीचा समावेश असावा. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, त्‍यांच्या संगोपनाची जबाबदारीही घ्‍यावी, असे प्रतिपादन रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांनी केले. निवी ते तळाघर मार्गावर हिरवाईचा बहर आणण्यासाठी अनेक संस्‍थांनी सहभाग घेतला आहे.
तळाघर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची मोहीम सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी वनरक्षक रोहा विकास राजपूत, वनरक्षक चांडगाव वैभव बत्तीसे, समाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, तळाघर हायस्‍कूलचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, रोटरी क्लब अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, शशिकांत मोरे, अनंत देशमुख, रवी दिघे, समिधा अष्टीवकर, निधी गर्ग, दीपाली जाधव, विदुला परांजपे उपस्‍थित होते.
रोहा ः निवी - तळाघर मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले.

....................

विद्यार्थ्यांकडून बिजांची उधळण
माणगाव (बातमीदार)ः शिरवलीतील न्यू इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जतनासाठी वृक्षारोपण मोहीम हाती घेऊन शालेय परिसर व रस्त्याच्या कडेला बिजांची उधळण केली. विष्णू बुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्रातर्फे देण्यात आलेल्या आंब्याचे १७५ बाठे (बिया) व करंजाच्या सुमारे २०० बियांचे रोपण नुकतेच शाळा परिसर व शिरवली-जिते मार्गावर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बीज
रोपण करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही घेतली असून हा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला आहे.

माणगाव ः विद्यार्थ्यांनी बियांची उधळण केली.
............

भूस्‍खलन रोखण्यासाठी बांबू लागवड
सात लाख रोपे लावण्याचा संकल्‍प
अलिबाग, ता. ११ (बातमीदार) ः मातीची धूप थांबवण्यासाठी बांबूचे झाडे फायदेशीर ठरतात. जिल्ह्यातील दरडग्रस्त भागात बांबूची लागवड करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. बांबूपासून रोजगार निर्मितीला चालना मिळण्याबरोबरच भुस्खलन रोखता येणार असल्‍याने जिल्ह्यात सुमारे सात लाखांपेक्षा अधिक रोपे लावून बांबूची बेटे तयार करण्याचा संकल्‍प जिल्‍हा परिषद आणि प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमध्ये गतवर्षी जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पोलादपूर, कर्जत तालुक्यासह महाडमध्ये दरड कोसळली होती. डोंगराळ भागातील अनेक झाडे उन्मळून पडली होती. दगड-मातीच्या ढिगाऱ्यांमुळे गावे चिखलमय झाली होती. महाड येथील दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत दरड रोखण्यासाठी बांबू लागवडीला प्राधान्य दिले आहे.
जिल्‍ह्यातील डोंगरभागात वर्षभरात जवळपास सुमारे दोन लाख बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. बांबूचे मूळ माती धरून ठेवतात. मातीची धूप रोखण्यास मदत होते, हे लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुढाकार घेत गावे-वाड्यांमध्ये बांबूची लागवड सुरू केली आहे. यासाठी तालुका, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहायता बचत गट, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवकांना सहभागी करून घेतले जात आहे. जिल्ह्यात सुमारे सात लाखांपेक्षा अधिक बांबूची बेटे तयार करण्याचा संकल्‍प जिल्‍हा परिषद आणि प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

व्यवसाय वृद्धीला चालना
ग्रामीण जिल्हा असल्याने बांबूपासून तयार होणाऱ्या उपकरणांना पसंती दर्शविली जाते. टोपली, सूप, झोपाळा, बांधकाम व्यवसाय, खुर्ची, आराम खुर्ची, डायनिंग सेट, सोपा सेट, टीपॉय, शो-पीस, विद्युत दिवे, बेड, ट्रॉली, परडी आदी फर्निचर बनविण्याचे काम बांबूपासून केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी बांबूच्या गॅलरी उभ्या होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात बांबू लागवडीमुळे व्यवसाय वृद्धीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

दरड रोखण्यासाठी बांबूची लागवड महत्त्वाची आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर बांबूची लागवड करण्यासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मागणी करण्याची सूचना केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बांबू लागवडीतून रोजगाराचे साधनही खुले होणार आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

बांबूची लागवड केल्यावर तीन ते चार वर्षांत उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. हे उत्पादन सुमारे ३५ वर्षे मिळते. जिल्ह्यात पाऊस भरपूर पडतो. दरड कोसळण्याची अधिक भीती आहे. त्यामुळे दरड रोखण्यासाठी बांबूच्या लागवडीसाठी रोपांचे वितरण करण्याचे काम सुरू आहे.
- नरेंद्र पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com