nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtc
nanded st news passengers increased various scheme of govt revenue msrtcesakal

MSRTC: एसटी ही महिलांना वाटते आपली! सवलतीचा खासगी वाहतूकदारांना फटका

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधील तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची योजना १७ मार्चपासून लागू करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जात आहे. मात्र, या योजनेमुळे खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहतूकदार अडचणीत आले आहेत.

रायगड जिल्ह्यात आजही एसटीकडे खात्रीशीर सेवा म्हणून पाहिले जात असे. सुरक्षित आणि कमी खर्चात प्रवास होत असल्याने प्रवासी तासन् तास एसटीची वाट पाहत असतात. काही वर्षांपासून एसटीच्या ढिसाळ कारभारामुळे फेऱ्या कमी झाल्या आहेत. याचा फायदा खासगी वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनी घेतला. तीन चाकी, सहा आसनी विक्रम, इको रिक्षा अशी विविध वाहने रस्त्यावर धावू लागली. प्रवाशांनाही तत्काळ सेवा मिळू लागली होती. याच खासगी वाहतूक सेवेचे विकृतीकरण झाल्याने जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी क्षमता नसतानाही जादा प्रवासी घेऊ लागले. परिणामी, अपघात वाढू लागले.

शिंदे-फडणवीस सरकारने मार्च महिन्यात महिलांना प्रवास सवलत देऊन एसटी वाहतुकीला बळकटीकरण करण्याची घोषणा केली. या घोषणेने एसटीच्या प्रवासी संख्येत जवळपास ५० टक्के वाढ झाल्याची माहिती रामवाडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून देण्यात आली. मागील साडेचार महिन्यांत जिल्ह्यात ७९ लाख ६ हजार ९२ इतक्या महिला प्रवाशांनी एसटी सवलत योजनेचा लाभ घेतलेला आहे. यातून कोट्यवधी रुपयांचा रायगड एसटी विभागाला फायदा झाला आहे. पूर्वी हा फायदा खासगी वाहतूकदारांना मिळत होता.

कर्जाचे हप्ते कसे भरायचे?
शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरदार वर्गाला निश्चितस्थळी पोहचण्याची घाई असल्याने सर्वजण खासगी वाहनांचा वापर करत होते. प्रवासी वाहतुकीमध्ये चांगला फायदा असल्याने अनेकांनी कर्ज काढून वाहने घेतली. ज्यांनी अलिकडेच कर्जाने वाहने घेतली, त्यांना हप्ते कसे भरायचे, हा गंभीर प्रश्न पडला आहे. खासगी वाहनांची संख्या जास्त; पण प्रवाशांची संख्या कमी असल्याने वाहतुकदारांना दिवसाचा खर्चही काढणे कठीण झाले आहे.

एक विश्वसनीय आणि खात्रीशीर सुरक्षित प्रवासासाठी महिला एसटीकडे पाहू लागल्या आहेत. सध्या एसटीमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे एसटी ही महिलांना आपली वाटते. कोकणात बाजार खरेदीसाठी किंवा मालाच्या विक्रीसाठी महिलाच घराबाहेर पडत असतात. त्यांच्यासाठी हा प्रवास अधिक फायद्याचा ठरत आहे.
- दीपक गोडे, वाहतूक नियंत्रण, विभागीय कार्यालय-रामवाडी

खराब रस्त्यांमुळे निघणारी दुरुस्तीची कामे, आरटीओ नोंदणी शुल्क, इंधनाचे वाढते दर यामुळे गाडीचे हप्ते देण्याइतकेही उत्पन्न मिळत नाही. पावसाळ्यात तर तोटा सहन करून धंदा करावा लागतो. पूर्वी या व्यवसायात नक्कीच फायदा होता; परंतु महिलांच्या एसटी सवलतीने तो नाहीसा झाला.
- सूर्यकांत पाटील, खासगी वाहतूकदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com