

वाळू उत्खननामुळे पूल कमकुवत
कोट्यवधींच्या डागडुजीनंतरही अवजड वाहतुकीत अडथळे
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : लिलाव न झाल्याने सध्या रायगड जिल्ह्यात नदीपात्रातील वाळू उत्खनन अधिकृतरीत्या सध्या बंद आहे. असे असले तरी बेकायदेशीर वाळू उत्खननाने रेवदंडा, आंबेत-म्हाप्रळ यासारखे महत्त्वाची पूल कमकुवत झाले आहेत. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले तरी अवजड वाहतुकीसाठी दोन्ही पूल सक्षम नसल्याचे समोर आले आहे. पर्यायी पुलांची निर्मिती लगेचच शक्य नसल्याने कमकुवत झालेले पूल जास्तीत जास्त दिवस सुस्थितीत ठेवण्यासाठी बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. पूल असलेल्या परिसरातील वाळू उत्खननास निर्बंध आणण्याची मागणीही बांधकाम विभागाने महसूल विभागाकडे केली आहे.
खनिकर्म विभागाने सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, अंबा नदीतील वाळू पट्टे लिलावासाठी काढले आहेत. ज्या परिसरात वाहतुकीचे प्रमुख पूल आहेत, तेथील वाळू पट्टे लिलावात न काढण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे कारणही तितकेच गंभीर आहे. रेवदंडा, आंबेत पुलाच्या स्थितीकडे दुर्लक्ष झाल्यास सावित्री पुलासारखा प्रकार घडू शकतो.
सावित्री पूल दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये रेवदंडा आणि आंबेत पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत सुचवण्यात आले होते. तीन वर्षांपासून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत-म्हाप्रळ पुलाची दुरुस्ती सुरू होती. गेल्या महिन्यातच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. अनेकवेळा दुरुस्ती करूनही हा पूल वाहतुकीसाठी सक्षम होत नव्हता. नदीपात्रातील वाळू उत्खननाने त्याचे खांब कमकुवत झाले होते. डागडुजीसाठी जवळपास २५ कोटींचा खर्च करावा लागला. अद्यापही पुलावरून अवजड वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. अशीच परिस्थिती अलिबाग - मुरूड, रोहा या तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा पुलाची आहे. या पुलाची दुरुस्ती अद्याप सुरूच आहे. दोन्ही पूल ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहेत. मात्र, कमकुवत खांबांमुळे मुदतीपूर्वीच पुलांची दुरुस्ती करावी लागली.
बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. खांबांना आधार देणारी जमीन भुसभुशीत झाली आहे. अनेकवेळा खांबांना वाळू वाहतूक करणाऱ्या बार्जची धडक लागली आहे. त्यामुळे दोन्ही पूल अधिक कमकुवत झाले.
नवीन पुलासाठी सरकारला २० हजार पत्रे
सावित्री नदीवरील आंबेत - म्हाप्रळदरम्यानचा पूल नव्याने बांधावा, या मागणीसाठी पाच महिन्यांत २० हजार पत्र स्थानिक नागरिकांनी पाठवली आहेत. २५ कोटी रुपये खर्च करून नुकतीच पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. या खर्चात आणखी वाढ करून नवा पूल झाला असता, असे म्हणत संतोष अबगुल यांनी आंदोलन छेडत नव्या पुलाची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी आणि म्हसळा, दापोली, मंडणगड, महाड या तालुक्यातील नागरिकांनी वीस हजार पत्रे सरकारला पाठवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
रेवदंडा पुलाची डागडुजी सुरूच
आंबेत पुलाप्रमाणेच अलिबाग-मुरूड तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा पुलाचीही अवस्था सारखीच आहे. मध्यंतरी एका मोठ्या बार्जने धडक दिल्याने पुलाचे खांब कमकुवत झाले. त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात असे. कमकुवत झालेल्या रेवदंडा पुलाच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अजूनही दुरुस्तीचे काम सुरूच आहे. दुरुस्तीनंतर पुलाचे आयुष्य किती वर्षे वाढेल, याबाबत माहिती देण्यात सार्वजनिक बांधकाम विभागचे अधिकारीही टाळाटाळ करीत आहेत.
पूल असलेल्या नदीपात्रात वाळू उत्खनन करू नये किंवा त्यास लिलावाद्वारे परवानगी देऊ नये, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महसूल विभागाला पाठवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उत्खननाने पुलांचे खांब कमकुवत होत आहेत. दुरुस्ती करून काही वर्ष त्यांचे आयुष्य वाढेल; परंतु ते दीर्घकाळ टिकणार नाहीत. कमकुवत झालेले पूल नव्याने बांधावेच लागतील. आंबेत पुलासाठी बाजूला जागा आहे, त्याकरिता नव्याने भूसंपादन करावे लागेल.
- महेश नामदे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.