झिराडमध्ये नैसर्गिक पाणवट्यावर केला डंप्मिग ग्राऊंड

झिराडमध्ये नैसर्गिक पाणवट्यावर केला डंप्मिग ग्राऊंड
Published on

पेणमध्ये डम्‍पिंग गाऊंडचा कचरा शेतात
नगरपालिकेचे दुर्लक्ष; शेतकऱ्याचा आंदोलनाचा इशारा

पेण, ता. २९ (वार्ताहर) : देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे, मात्र पेण नगरपालिकेने या अभियानाला केराची टोपली दाखवली आहे. शहारातून दररोज उचलण्यात येणारा घनकचरा आंबेगाव येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो, मात्र हा कचरा शेतकऱ्यांच्या जागेत पसरल्‍याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याप्रकरणी अनेकदा तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्‍याने लवकरच आंदोलन करणार असल्‍याचा इशारा शेतकरी डॉ. सिद्धार्थ पाटील व डॉ.विजयश्री पाटील यांनी दिला आहे.
पेण नगपालिकेने स्‍वःमालकीच्या आंबेगाव, धामणी परिसरातील सर्व्हे नंबर १५६ भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उभारले आहे. याच डम्पिंग ग्राऊंडला लागून सर्वे नंबर १५७ आणि सर्वे नंबर १५८ ही सव्वा दोन एकर जागा डॉ. सिद्धार्थ अंबाजी पाटील व डॉ. विजयश्री सिद्धार्थ पाटील यांच्या मालकीची आहे. नगरपालिकेकडून सर्व्हे नंबर १५६ ची जागा मोकळी ठेवून पाटील यांच्या भूखंडावर कचरा लोटत आहे. तर काही वेळा गुरांमुळे, भटक्‍या कुत्र्यांमुळे तो सर्वत्र पसरतो. त्‍यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे.
एकीकडे देशाचे पंतप्रधान स्वच्छ्तेचे धडे देत असताना दुसरीकडे पेण नगरपालिका प्रशासन या संदेशाची पायमल्ली करून दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून घनकचरा टाकत असल्‍याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे. याबाबत शेतकरी सिद्धार्थ पाटील यांनी पेण पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांनाही पत्रव्यवहार केला आहे. स्थानिक खासदार सुनील तटकरे, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडेही व्यथा मांडली आहे. येत्‍या काही दिवसांत महापालिकेने योग्‍य कार्यवाही न केल्‍यास आंदोलन करणार असल्‍याचा इशारा डॉ. सिद्धार्थ पाटील यांनी दिला आहे.

पेण तालुक्यातील आंबेगाव येथे नगरपालिकेचा डम्पिंग ग्राऊंड आहे. त्यालगत डॉ. सिद्धार्थ पाटील यांची मालकीची जागा आहे, या जागेमध्ये नगरपालिकेचा घनकचरा काही अंश गेला आहे. ती जागा स्वच्छ करून देण्याची जबाबदारी आमची आहे. डॉ. सिद्धार्थ पाटील यांनी नगरपालिकेकडे केलेल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. ही जागा नगरपालिकेकडे घ्यायची की स्वच्छ करून त्‍यांना द्यायची याबाबत विचारविनिमय सुरू आहे. सरकारकडून जुन्या जागांसाठी काही निधी आला आहे, त्यानुसार नगरपालिका प्रशासन योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर प्रकरण मार्गी लावेल.
- जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण

..................

कचऱ्यामुळे नैसर्गिक पाणवठा नष्‍ट
झिराडमध्ये डम्‍पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न ऐरणीवर; सेलिब्रिटींनाही त्रास

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९: सागरी मार्गामुळे मुंबईपासून अंतर कमी झालेल्या मांडवा परिसराचा झपाट्याने विकास होत आहे; परंतु योग्‍य नियोजनाअभावी काही ग्रामपंचायतींचा परिसर बकाल होत आहे. सेलिब्रिटींचे बंगले असलेल्या झिराड ग्रामपंचायतीतील समस्‍या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. फेरफटका मारण्यासाठी असलेल्‍या मोकळ्या जागेत ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राऊंड तयार केले आहे. येथील नैसर्गिक पाणवठाही या डंम्पिग ग्राऊंडमुळे नाहीसा झाला.
स्थानिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर झिराड ग्रामपंचायतीने डंम्पिग ग्राऊंड अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेतला; मात्र, तोपर्यंत परिसर विद्रूप झाला असून वाऱ्यामुळे कचरा लगतचे बंगले, घरे, फार्महाउसमध्ये उडत असल्‍याने रहिवासी त्रस्‍त आहेत. याच परिसरात उद्योजक, क्रिकेटपटू, सिने तार-तारकांचे बंगले आहेत. बंगल्यांपर्यंत कचरा उडत असून दुर्गंधी पसरली आहे.
डंम्पिग ग्राऊंड, बेकायदेशीर माती उत्खनन या विरोधात ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून नैसर्गिक पाणवठा तसेच परिसरातील निसर्गसौंदर्य वाचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे सध्या हा परिसर भकार दिसू लागला आहे. डम्पिग ग्राऊंडला कुंपण नसल्याने गावातील मोकाट गुरे, शेळ्या- मेंढ्या कचऱ्यामध्ये अन्न शोधताना दिसतात. यातून रोगराई पसरण्याची

शक्यता वर्तवली जात आहे. डम्पिग ग्राऊंड दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला असला तरी अजूनही कचरा त्‍याच ठिकाणी टाकला जात आहे. यावर निर्बंध आणून दोषींवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

कचरा टाकला जात असलेली जागा डम्पिग ग्राऊंडची नव्हती, त्यामुळे तेथे तारेचे कुंपण घालण्यासाठी कोणतीच तरतूद करता आलेली नव्हती. नागरिकांना होणारा त्रास पाहता, पूर्वीपासून सुरू असलेले हे डम्पिग ग्राऊंड बंद करून पर्यायी जागेत कचरा टाकला जाईल.
- संजय पाटील, ग्रामसेवक, झिराड

मुंबईतील लोक याठिकाणी येऊन राहू लागल्‍याने आर्थिक सुबत्ता आली आहे. तरुणांना चांगल्याप्रकारे रोजगार मिळू लागला आहे. मात्र काही राजकारणी मुंबईतील लोकांना नाहक त्रास देत पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहेत. वारंवार मागणी करूनही डम्पिग ग्राऊंड बंद न करण्याचेही तेच कारण आहे.
- संदेश थळे, युवासेना अध्यक्ष, शिवसेना-अलिबाग

फोटो -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com