पर्यावरण दिन विशेष  निसर्ग सौंदर्याने नटलेला जैवविविधतेने समृद्ध रायगड

पर्यावरण दिन विशेष निसर्ग सौंदर्याने नटलेला जैवविविधतेने समृद्ध रायगड

जैवविविधतेमुळे पर्यटनाला चालना
वनराई टिकवण्यासाठी, संवर्धनासाठी वनविभागाच्या उपाययोजना; स्‍थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्‍ध
अमित गवळे, पाली
निसर्ग सौंदर्याने नटलेल्‍या रायगड जिल्‍ह्यात पक्ष्यांच्या ४२६ प्रजाती आढळल्‍याची नोंद आहे. राज्य पक्षी हरियाल, राज्य फुल ताम्हण, राज्य प्राणी शेकरू, राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन येथे आढळतात. शिवाय निसर्ग, कृषी पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यात आता कांदळवन पर्यटनही बहरत असल्‍याने रोजगाराच्या विविध संधी उपलब्‍ध होत आहेत. पर्यावरणाच्या दृष्‍टिने समृद्ध असलेल्‍या जिल्‍ह्यातील वनराई टिकवण्यासाठी वनविभागाकडून जनजागृतीबरोबरच विविध उपक्रमही राबवले जात आहेत.
जिल्ह्याचे एकूण क्षेत्र सात हजार १४८ चौरस किलोमीटर इतके आहे. तब्बल २४० किमीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि जोडीला जैवविविधतेला आधार देणारी कांदळवने असल्‍याने स्थलांतरित पक्षीही मोठ्या संख्येने येतात. पूर्वेकडील सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किनाऱ्यालगतचा खलाटीचा प्रदेश, त्‍यामधील मैदानी व सखल भाग, अशी जिल्ह्याची रचना आहे. पूर्वेकडील सह्याद्री रांगांच्या डोंगराळ प्रदेशात कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव, महाड व पोलादपूर या तालुक्याचा पूर्व भाग समाविष्ट होतो. पनवेल, पेण, रोहे, माणगाव, म्हसळे व महाड या तालुक्याचा बराचसा भाग जिल्ह्यांच्या मध्य भागातील सखल व मैदानी प्रदेशात मोडतो. अनेक नद्यांच्या छोट्या-मोठ्या खोऱ्यांनी हा सखल व मैदानी भाग सुपीक बनला आहे.
उरण, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या तालुक्यांचा बहुतांश भाग किनारी प्रदेशात किंवा खलाटीत येतो. उल्हास, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ व सावित्री या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. श्रीवर्धन, महाड, माणगाव, मुरुड, अलिबाग पेण, पनवेल, कर्जत, रोहे आणि सुधागड या तालुक्यांमध्ये वनाचे प्रमाण अधिक आहे. येथील काही भाग हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला आहे त्यामुळे तेथे पर्यावरणवाद्यांचे अधिक लक्ष आहे.
जिल्ह्यातील वनांमध्ये साग, ऐन, खैर, आंबा, चिंच यासारखे वृक्ष आहेत. येथील वनांमध्ये बिबटे, भेकर, वाघ, कोल्हे, रानडुक्कर, दुर्मिळ चौशिंगा यांसारखे प्राणी आढळतात. उरण तालुक्यात घारापुरी, अलिबाग येथील कार्ले खिंड जवळ व माथेरान येथे वनोद्याने आहेत. फक्त कर्नाळा फणसाड अभयारण्य नाही तर जिल्ह्यातील सर्वच भागात विविध प्रकारचे पक्षी, झाडे व प्राण्यांच्या प्रजाती आढळतात.

दुर्मिळ पशुपक्षी
श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजेच्या खाडीत काही दिवसांपूर्वी दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले होते. खाडीत मासेमारी करताना मच्छीमारांच्या जाळ्यात हा जीव सापडला होता. तर मार्चमध्ये अलिबाग तालुक्यातील सारळ समुद्रकिनारी रेड नोट (लाल जलरंक) या दुर्मिळ पक्षाचे अभ्यासक वैभव पाटील यांना दर्शन झाले होते. अलिबाग येथील पक्षी निरीक्षक प्रवीण कवळे यांनाही रेवस खाडीकिनारी हा पक्षी दिसला होता.
माणगाव विळे येथील पक्षी अभ्यासक राम मुंडे यांना, एप्रिलमध्ये भारतीय गिधाड किंवा लांब चोचीचे गिधाड, हिमालयन ग्रिफॉन गिधाड व पांढऱ्या पाठीचे गिधाड या नामशेष होत चाललेल्या गिधाडांच्या प्रजाती एकत्र पाहण्याचा व त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याचा दुर्मिळ योग आला. आश्चर्य म्हणजे उन्हाची तीव्रता पाहता, दुर्मिळ असे हिमालयन ग्रिफॉन जातीच्या गिधाडांची जोडी हजारो किलोमीटर प्रवास करून रायगड जिल्‍ह्यातील माणगाव तालुक्यात एप्रिलमध्ये दिसून आली.

पशुपक्ष्यांच्या संख्येत वाढ
पनवेल तालुक्यात कर्नाळा हे पक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य असून वनसंपदेबरोबरच याठिकाणी १५० प्रजातीचे पक्षी आढळतात. तर मुरूडच्या फणसाड अभयारण्यात अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, निलगिरी आणि सावर असे सुमारे ७०० प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे प्राणी आणि ९० हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरे असल्‍याची नोंद नुकतीच करण्यात आली आहे.

जिल्ह्यात जवळपास २९ प्रकारचे पक्षी पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहेत. उदाहरणार्थ मलबारी व राखी धनेश, निलगिरी रानपारवा, करड्या डोक्याची मैना, पांढऱ्या गालाचा कुटूरगा आदी. भविष्यात हा अनमोल ठेवा असाच समृद्ध ठेवायचा असेल तर त्याचे संवर्धन व जतन करण्याची गरज आहे.

- प्रवीण कवळे, पक्षी निरीक्षक, अलिबाग

जैवविविधनेने नटलेल्‍या रायगडमध्ये कांदळवनांचे क्षेत्रही मोठे आहे. येथे देशी-विदेशी पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण असल्‍याने त्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्‍यांचे निरीक्षण, अभ्‍यासासाठी पर्यटक आवर्जून जिल्‍ह्यात येतात. अलिबाग विरार व कोस्टल रोडमुळे रायगड किनारपट्टी मुंबई व ठाण्याच्या आणखी जवळ आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जिल्‍ह्‌यात वनविभागाकडून उपाययोजना राबवण्यात येत आहे.
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग

रायगड जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या निसर्गसंपन्न असून येथे घनदाट जंगले आहेत, नद्या आहेत, दलदलीचे प्रदेश आहेत, दख्खन पठारांप्रमाणे येथे मोठी पठारे आहेत, माळराने आहेत, कांदळवने, समुद्रकिनारे आहेत. हजारो स्थलांतरित पक्षी थंडीमध्ये जिल्‍ह्यात दाखल होतात. येथे अनेक दुर्मिळ तसेच संवेदनशील पक्ष्यांच्या प्रजाती आणि प्राण्यांचे वास्तव्य आहे.
- शंतनु कुवेसकर, पर्यावरण अभ्यासक, माणगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com