पावसाच्या तोंडावर आवंढे खांडपोली कामथेकरवाडी ग्रामस्थांची वाट खडतर रस्त्याचे काम अपूर्ण

पावसाच्या तोंडावर आवंढे खांडपोली कामथेकरवाडी ग्रामस्थांची वाट खडतर रस्त्याचे काम अपूर्ण

आवंढे, खांडपोलीतील रस्‍त्‍याचे काम अपूर्ण
पावसाळ्यात चिखलातून प्रवास करण्याची वेळ

पाली, ता. ५ (वार्ताहर)ः काही महिन्यांपासून चालू असलेल्या भेरव, आवंढे, कामथेकरवाडी रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले आहे. पावसाळा तोंडावर असताना, अपूर्ण कामामुळे ग्रामस्‍थांना चिखलातून प्रवास करावा लागणार लागण्याची शक्‍यता आहे.
भेरव, आवंढे, कामथेकरवाडी रस्त्याच्या काम अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याला मान्यता मिळाली असून सिद्धी विनायक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून पोटठेकेदार आर. डी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून काम करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत रस्त्यावर खडी टाकून मातीचा भराव करण्यात आला आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी टाकण्यात आलेल्या मोऱ्यांची कामे नुकतीच पूर्ण झाली आहेत. भेरव ते कामथेकरवाडी हे चार किमीचे अंतर असून अवघ्‍या काही दिवसांवर आलेल्या पावसापूर्वी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. याच कंपनीने पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याचे कामही हाती घेतले आहे, तिथली परिस्थितीतही जैसे थेच आहे. लवकरात लवकर रस्‍त्‍याचे काम पूर्ण न झाल्‍यास ग्रामस्‍थांना चिखालातून वाट काढावी लागणार आहे.

ग्रामस्थांची परवड
भेरव, आवंढे, खांडपोली, कामथेकरवाडी, पेडली आणि आदिवासी वाड्या-वस्त्यांना जोडणारा एकच रस्‍ता असून लोकसंख्याही मोठी आहे. येथे एसटी महामंडळच्या बस जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. कामानिमित्त व्यवसायासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी जातात. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाली, पेडली, खोपोलीसारख्या ठिकाणी जावे लागते. विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची मानवविकास बसच्या काही फेऱ्या शाळेच्या वेळेत असतात परंतु आता खराब रस्त्यामुळे किंबहुना रस्ताच नसल्याने बस सेवा बंद होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात विद्यार्थी, वृद्ध, आजारी व्यक्तींचा प्रवास खडतर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गावातून वर्दळीचा हा एकमेव मार्ग आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही तर पावसाळ्यात चिखलातून प्रवास करावा लागेल. आवंढेवरून पेडलीत जाण्यासाठी मधला रस्ता आहे. मात्र पावसाळ्यात त्यावरून वारंवार पुराचे पाणी जात असल्याने भेरवमार्गेच जावे लागते. रस्त्याचे काम संथगतीने व निकृष्ट पद्धतीने सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगून दुर्लक्ष होत आहे.
- नरेश देशमुख, ग्रामस्‍थ, आवंढे

मशिनरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काम रखडले होते. खडीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्याआधी प्रवाशांची रहदारी योग्य प्रकारे होईल, यासाठी व्यवस्था केली जाईल.
- चंदन मोरे, कनिष्ठ अभियंता

पाली ः आवंढे-कामथेकरवाडी रस्त्याचे काम अपूर्णावस्‍थेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com