उधाणातील नुकसान भरपाईची प्रतीक्षा

उधाणातील नुकसान भरपाईची प्रतीक्षा

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : वर्षातील किमान १७ दिवस किनारपट्टीलगतच्या गावांना उधाणाचा तडाखा बसत असून शेतजमीन नापीक होत आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्‌यातील लागवडीखालील क्षेत्रही कमी झाले आहे. असे असताना उधाणापासून झालेल्‍या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. उधाण ही नैसर्गिक आपत्ती असले तरी सरकारने अद्याप हे मान्यच केले नसल्याने नुकसानभरपाईचे कोणतेही निकष शेतकऱ्यांना लागू होत नाही. या विरोधात खारेपाटातील शेतकऱ्यांचा २० वर्षांपासून संघर्ष सुरू असून उधाणाचा नैसर्गिक आपत्तीत समावेश करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
उधाणामुळे शाळा, वीज, पिण्याचे पाणी, वाहतूक अशा सर्वच पायाभूत सुविधा कुचकामी ठरतात. पावसाळ्यात येणाऱ्या उधाणामध्ये नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागतो. जिल्‍ह्यातील शेतीची परिस्थिती तर दिवसेंदिवस बिकट होत आहे. उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्तीला तडे जातात. याची दुरुस्ती न झाल्याने आतापर्यंत हजारो एकर जमीन नापीक झाली आहे.
शेतात, गावांत समुद्राचे आणि खाडीचे पाणी शिरल्याने पूरसदृश स्‍थिती उद्भवते. ज्यामुळे पिकांचे आणि घरांचे नुकसान होते. पण नैसर्गिक आपत्तीत उधाणांचा समावेश नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. समुद्राला येणाऱ्या उधाणाचा कोकण किनारपट्टीला दरवर्षी फटका बसतो. मोठ्या उधाणामुळे खारभूमी योजनांना तडे जातात. समुद्र आणि खाडीलगतच्या शेतात समुद्राचे खारे पाणी शिरते. खाऱ्या पाण्यामुळे जमीन नापीक होते.

सरकारच्या निकषानुसार पूर, अतिवृष्टी, दरड, वादळे यांचा नैसर्गिक आपत्तीत समावेश होत असला तरी, समुद्राला येणाऱ्या उधाणाचा नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्‍यामुळे बाधित शेतकरी आणि रहिवाशांना कुठलीही सरकारी मदत मिळू शकत नाही. कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या उधाणांचाही नैसर्गिक आपत्तीत समावेश करावा, अशी मागणी बाधितांकडून करण्यात येत असून त्‍यासाठी वर्षोनुवर्षे संघर्ष सुरू आहे.


पिकत्या भातशेतीत उगवली खारफुटी
किनाऱ्यालगतच्या बांधबंदिस्तीची दुरुस्ती शेतकरी पूर्वी हांदा पद्धतीने करीत. १९६० मध्ये यासाठी खारभूमी विभागाची स्थापना करण्यात आली, परंतु या विभागाने बांधबंदिस्तीकडे दुर्लक्ष केल्याने भातशेतीत उधाणाचे खारे पाणी घुसू लागले. उधाणांचा दोन दशकात शेतजमिनीला मोठा फटका बसला आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील शेती उधाणाच्या तडाख्यामुळे कायमची नापिक झाली असून कांदळवने पसरली आहेत. प्रामुख्याने माणकुळे, बहिराचा पाडा, नारंगी खार, रामकोठा, सोनकोठा, हाशिवरे, कवाडे, फुफादेवी, मेढेखार, मिळकतखार, शाहाबाज यांसारख्या गावातील शेतजमिनींचा समावेश आहे. शेती नापिक होऊनही शेतकऱ्यांना सरकारकडून एक रुपयाची मदत मिळालेली नाही.

रायगडमध्ये सर्वाधिक खारभूमी क्षेत्र
कोकणात रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांत ४९ हजार ११३ हेक्टर इतके खारभूमी लाभक्षेत्र आहे. यात सर्वाधिक जास्त रायगड जिल्ह्यातील २१ हजार २९६ हेक्टरचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यातील ३ हजार ०१६ हेक्टर खारभूमी क्षेत्र उधाणामुळे कायमचे नापीक झाले आहे. याची दखल घेत राज्य सरकारने उधाणाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावे , अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने केली आहे. यासाठी अनेकवेळा आंदोलनेही झाली असून अधिकाऱ्यांना घेरावही घालून झाला; परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्‍या नाहीत.

आमच्या पूर्वजांनी कष्टाने लागवडीखाली आणलेली शेती सरकारच्या नाकर्तेपणामुळे नापीक झाली आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि शेतमजूर बेरोजगार झाले आहेत. रोजगाराचे साधन गमावून बसलेले नागरिक स्थलांतर करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारच्या निकषांमुळे तीन हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना एक रुपयाची मदतही मिळू शकलेली नाही. २० वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत.
- राजन भगत, सामाजिक कार्यकर्ते

उधाणांचा नैसर्गिक आपत्तीत समावेश नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. यासंदर्भात सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पण निर्णय झाला नव्हता. कोकणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे यासंदर्भात पाठपुरावा करू.
- महेंद्र दळवी, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.