मुशेतमधील घरांत शिरले पाणी

मुशेतमधील घरांत शिरले पाणी

Published on

मुशेतमधील घरांत शिरले पाणी
नदीत म्हैस वाहून गेली; भरावामुळे पूरस्‍थिती निर्माण झाल्‍याचा ग्रामस्थांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : तालुक्यात शनिवारीपासून पावसाने दाणादाण उडाली असून मध्यरात्री तीनच्या सुमारास मुशेत नदीला पूर येऊन पाणी गावातील घरांत शिरले. यावेळी अनेक ग्रामस्थांचे संसारपयोगी वस्तू भिजल्‍याने मोठे नुकसान झाले. मुशेत येथील एका शेतकऱ्याची म्हैस पुरात वाहून गेली. गावातील दर्ग्यातही पुराचे पाणी शिरले.
सोमवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्‍यावर रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे, माजी ग्राम पंचायत सदस्य अण्णा सातमकर, अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते सज्जाद सय्यद, ग्रामविकास अधिकारी माधुरी भोईर यांनी पूरस्‍थितीची पाहणी केली.
गावात एका विकासकाने नाल्यावर बेकायदा भराव करून पाण्याची नैसर्गिक वाट बंद केल्यामुळे व नदीवर बंधारा बांधल्यामुळे पुराचे पाणी गावात शिरल्याचा आरोप यावेळी संतप्त ग्रामस्‍थांनी केला. लवकरात लवकर भराव काढून नाल्याची नैसर्गिकरित्या असलेली वाट मोकळी करावी, तसेच नदीवरील बांधलेला बंधारा त्वरित काढावा, अन्यथा नदीला पूर येऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ढगफुटी सदृश पाऊस व समुद्राला आलेल्‍या भरतीमुळे पाणी गावात शिरले आहे. तसेच केलेल्या भरावावर व बंधाऱ्यात बाबतीत सविस्तर चर्चा करून लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- संतराम हांगे, तलाठी, मुशेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.