पूई पुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात

पूई पुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात

Published on

मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून ब्लॉक
पुई पुलावर गर्डर बसवणार; तीन दिवस पर्यायी मार्गाने वाहतूक
अलिबाग/रोहा, ता. १० : मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (ता. १०) तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोलाडजवळील पुई येथे म्हैसदरा नदीवरील नवीन पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
कल्याण टोल इन्फ्रा कंपनीतर्फे उद्यापासून काम हाती घेण्यात आले असून महामार्गावर १३ जुलैपर्यंत तीन दिवसांत सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार असे दोन टप्प्यांत ब्लॉक घेतले जाणार आहेत. या काळात महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे. १२ वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. रुंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पुलांची कामे रखडली आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी कोलाडजवळील पुई येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम ११ ते १३ जुलैदरम्यान केले जाणार आहे. यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आले आहेत. गर्डर बसवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री पुलाजवळ दाखल झाली आहे. हे काम करताना वाहतूक बंद ठेवणे गरजेचे असल्याने ठेकेदार तथा महामार्ग विभागामार्फत वाहतूक महासंचालकांकडे वाहतूक बंद ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वाहतूक विभाग अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयातील पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना मंगळवारी उशिरा जारी केली.
*****
पर्यायी मार्ग कोणते?
- कोकणाकडे जाणारी वाहने वाकण येथून पालीमार्गे भिसेखिंड, रोहा-कोलाडमार्गे मार्गस्थ होतील. तसेच पाली, रवाळजे, निजामपूर, माणगावमार्गे आणि खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगावमार्गे पुढे जातील.
- मुंबईकडे जाणारी वाहने कोलाड- रोहा- भिसे खिंड- वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होतील. तसेच, कोलाड येथून रवाळजे-पालीवरून वळवून वाकण- पाली- खोपोली मार्गावरून मार्गस्थ होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.