गावोगावी गोविंदांचा जल्लोष

गावोगावी गोविंदांचा जल्लोष
Published on

जिल्ह्यातील वातावरण कृष्णमय; गावोगावी जल्‍लोष

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : ‘गोविंदा रे गोपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा...’ यांसारखी पारंपरिक गाणी आणि ताशाच्या ठेक्यावर निघालेल्या गोविंदा पथकांच्या जल्लोषाने मंगळवारी जिल्ह्यातील वातावरण कृष्णमय झाले होते. जिल्ह्यात तब्बल आठ हजार ५०६ दहीहंड्या फोडण्यात आल्या. यात सहा हजार ६४१ खासगी दहीहंड्या होत्या. सकाळपासूनच गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी चौकाचौकात फिरत होती.
अष्टमीच्या मध्यरात्री कृष्णजन्मापासून गोपाळांचा जल्लोष वाढू लागला. ग्रामीण भागात कृष्णजन्माष्टमीचा सण आज पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी सकाळपासूनच दहीहंड्या बांधण्याची लगबग दिसून आली. गावागावांत, वाड्या-पाड्यातून निघालेल्या गोविंदांच्या पथकाने यात रंगत आणली. पावसाने साथ दिल्‍याने चिंब भिजत महिला व पुरुषांच्या गोविंदा पथकांनी ढोल-ताशाच्या गजरात नृत्‍यावर ठेका धरला. यास डीजेच्या आवाजाचीही साथ मिळाली.
हातातली गदा हवेत फिरवत गोविंदा पथकाचे नेतृत्व करणाऱ्याच्या इशाऱ्यावर ही पथके गरीब असो वा श्रीमंत असो, त्याच्या दारी जाऊन हंडी फोडत होती. ‘बोल बजरंग बली की जय, तुझ्या घरात नाही पाणी, घागर... गोविंदा रे गोपाळा...’ अशी पारंपरिक गाणी म्हणत जिल्ह्यातील प्रत्येक गावांत कृष्णजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्यांना उशिराने सुरुवात
जिल्ह्यात एक हजार ८६८ सार्वजनिक दहीहंड्या लावण्यात आल्या होत्‍या. यात विविध राजकीय पक्षांनी प्रायोजित केलेल्या ३५ हंड्या होत्‍या. या सर्व दहीहंड्या मोठ्या रकमेच्या असून १० मंडळांनी एक लाख रुपयांहून अधिक बक्षीस जाहीर केले होते. गावातील दहीहंड्या फोडल्यानंतर सायंकाळी ग्रामीण भागातील गोविंदा पथके शहरात दाखल झाली. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेला दहीहंडी फोडण्याचा थरार रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण
मोठ्या रकमेच्या गोविंदा मंडळांनी सेलिबिटींना आमंत्रित केले होते. डीजे, आकर्षक रोषणाईसह दहीहंडी फोडण्याच्या थराराचे समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. सर्वच मंडळांनी या तंत्राचा वापर केल्याने दहीहंडी पाहण्यासाठी होणारी गर्दी यंदा काहीशी कमी होती. क्रेनच्या सहाय्याने काही ठिकाणी दहीहंड्या उभारण्यात आल्‍या होत्‍या. पावसात चिंब भिजत गोविंदांनी दिवसभर जल्‍लोष साजरा केला.

कानिफनाथाच्या मठातील आगळी दहीहंडी
अलिबागमध्ये अडीचशे वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या कानिफनाथाच्या मठात आगळीवेगळी दहीहंडी फोडली जाते. ही दहीहंडी पाहण्यासाठी अलिबागमधील भाविक दरवर्षी गर्दी करतात. चेंढरे येथे कानिफनाथांचा मठ आहे. अंगात देवाचे वारे येणाऱ्या भक्तांच्या अंगावर सोठा (चाबूक) मारून फटके दिले जातात. ही परंपरा जिल्ह्यातील इतर भागातही पाहण्यास मिळते. हंडीची विधिवत पूजा केल्यानंतर हंड्या आडव्या बांबूला बांधल्या जातात. त्यानंतर त्‍या आसूडाने फोडल्या जातात.

-----

पारंपरिक नृत्‍यावर ठेका
रेवदंडा (बातमीदार) : चौल-रेवदंडा परिसरात गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून सार्वजनिक मंडळे, गृहसंकुलांत दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्‍या. दुपारनंतर अनेक आळीतील गोविंदा पथकांनी वाजत-गाजत पारंपरिक नृत्‍य करीत मिरवणुका काढल्या. पारनाका येथे हंड्या फोडताना गोविंदा पथकाचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी बच्चेकंपनी राधा-श्रीकृष्णाच्या वेशभूषेत दिसली. दहीहंडी फोडल्यानंतर दही-पोहे, केळी, काकडी असा प्रसाद वाटण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चौकाचौकात पोलिस यंत्रणा सज्‍ज होती.
.................

राजकीय दहीहंड्यांना गोविंदांची पसंती
बेधुंद तरुणाईचा जल्‍लोष

खोपोली, ता. २७ (बातमीदार) ः पावसाची रिमझिम... मराठी, हिंदी चित्रपटातील गोविंदांवरील गाण्यांचे सूर... बेधुंद जल्‍लोष करणारी तरुणाई...आणि उत्‍साह बघण्यासाठी जमलेली गर्दी अशा उत्‍साहवर्धक वातावरणात शहरातील चौकाचौकात तसेच गृहसंकुलांत दहीहंड्या फोडण्यात आल्या. राजकीय नेते-मंडळींकडून आयोजित दहीहंड्यांना मोठ्या रकमांची बक्षिसे जाहीर करण्यात आल्‍याने गोविंदा पथकांनी आवर्जुन हजेरी लावली.
खोपोली नगरपालिका क्षेत्रात १० सार्वजनिक, २६ खासगी; तर रहिवासी भागात शेकडो दहीहंड्या फोडण्यात आल्या. शांत व सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्‍या खोपोलीत कोणताही वाद किंवा अपघाताची नोंद सायंकाळपर्यंत झाली नव्हती.
यंदा दहीहंडी उत्सवात सर्वच प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. आमदार महेंद्र थोरवे युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष अंकित साखरे व मित्र परिवार आयोजित दहीहंडी, शिवसेना नेते व उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व मित्रमंडळ आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथके आली होती. खासदार सुनील तटकरेंसहित विविध पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी खोपोलीतील दहीहंडी उत्सवाला भेट देत आयोजकांचा उत्साह वाढवला.
दुपारपासून ठिकठिकाणी दहीहंड्या फोडण्यासाठी थर रचण्यास सुरुवात झाली. संध्याकाळनंतर वातावरणात आणखीनच जल्‍लोष निर्माण झाला. या वेळी मनोरंजनात्‍मक कार्यक्रम, समाजातील विविध स्तरावर सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव, महिला गोविंदांसाठी खास बक्षिसे, सलामीसाठी रोख बक्षिसांचे आयोजन केले होते.
उत्‍सवानिमित्त चित्रपट, टीव्ही-मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, प्रमुख नेतेमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदांचा उत्‍साह वाढवला. दहीहंडी उत्‍सवानिमित्त शहरात लाखो रुपयांची उलाढाल झाल्‍याचे पाहायला मिळाले. यात २५ हजारांपासून दीड लाख, दोन लाख २२ हजार२२ रुपये इतक्‍या रकमेची बक्षिसे आयोजकांनी जाहीर केली होती.

खोपोली : राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आयोजित दहीहंडी उत्सवात मोठी गर्दी झाली होती.

............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com