

पाली, ता. ३ (वार्ताहर) ः छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सुधागड किल्ल्यावर विराजमान असलेली श्री भोराई देवी ही सुधागड तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धस्थान आहे. आश्विन नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येतात. गुरुवारी घटस्थापनेपासून किल्ल्यावर भाविकांची गर्दी वाढल्याने परिसर प्रफुल्लित झाला आहे.
श्री भोराई देवस्थान मंडळाचे विश्वस्तांकडून आजही गडावर पूर्वांपार पद्धतीने उत्सव साजरा केला जातो. सकाळी पूजा, अभिषेक, सायंकाळी आरती, रात्री कीर्तन असा कार्यक्रम असतो. अष्टमीच्या दिवशी गडकऱ्यांना मानाप्रमाणे नारळ व मानाचे विडे दिले जातात. सीमोल्लंघनाच्या दिवशी पालखी निघते. नवरात्रात हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो.
सुधागड किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराई देवीचे मंदिर आहे. देवीची प्रतिष्ठापना भृगु ऋषींनी केली आहे, म्हणून या देवीला ‘भृगूअंबा, भोरांबा, भोराई’ अशीही नावे आहेत. देवीची मूर्ती तीन फूट उंच आहे. मूळ चंडिकेचे स्वरूप असणारी श्री भोराई चतुर्भुज असून हातात त्रिशूळ, खङ्ग-खेटक आणि दोन हातात आसूड आहे. श्री भोराईदेवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंतसचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदेवता/कुलस्वामिनी मानले. पंतसचिव चिमणाजी रघुनाथ ऊर्फ नानासाहेबांनी पुत्रप्राप्ती झाल्यानंतर येथे १० दिवसांच्या आश्विन नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. त्या काळात उत्सव साजरा करण्याची जबाबदारी तालुक्याचे मामलेदार यांच्यावर होती.
दर्शनासह निसर्ग पर्यटनाचा आनंद
देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर येणारे भाविक आजूबाजूचा गर्द झाडीने नटलेला मनोहारी परिसर, वाहते धबधबे, नद्या, डोंगररांगा, थंड हवा यांचाही आनंद घेतात. शिवाय, किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक वास्तूंना भेट देतात.
पाली ः सुधागड किल्ल्यावर विराजमान झालेली श्री भोराई देवी.
पाली ः सुधागड किल्यावरील श्री भोराई देवीचे मंदिर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.