मतदान प्रक्रियेसाठी २० हजार कर्मचारी सज्ज
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (ता. २०) नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी सकाळपासून निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य घेऊन केंद्रावर जाण्यास सुरुवात झाली. साधारण २० हजार कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.
बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे, तसेच शनिवारी (ता. २३) रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये २४ लाख ८८ हजार ७८८ इतके मतदार असून, दोन हजार ८२० मतदार केंद्रे आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये १३ हजार १९१ दिव्यांग मतदार असून, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व वाहनाची प्रत्येक मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, ज्येष्ठ नागरिक, गर्भवतींसाठी विश्रांत कक्ष, त्यांना बसण्यासाठी खुर्च्या यासह उन्हात उभ्या राहणाऱ्या मतदारांसाठी मंडप उभारण्यात आले आहे.
मतदार माहिती चिठ्ठीचे ९८ टक्के वितरण झाले आहे, त्याचबरोबर आपले मतदान केंद्र कुठे आहे हे शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. मतदारांना वितरित करण्यात येणाऱ्या मतदार माहिती चिठ्ठीद्वारेदेखील कुठे मतदान करावयाचे आहे ते कळू शकेल.
७६१ दळणवळणासाठी वाहने
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांना केंद्रांवर ने-आण करण्याकरिता वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामध्ये एसटी बस ३४६, मिनी बस १२४, जीप २९१ अशी एकूण ७६१ वाहने ठेवण्यात आली आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार ईव्हीएम मशीन वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस सुविधा उपलब्ध केली आहे.
अंधांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका
अंध मतदारांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनवरच ब्रेल लिपीतील बटणांची सुविधा देऊ केली आहे. यामुळे अंध मतदारांना मतदान करणे सोपे होईल. या सुविधेमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच मतदान करणेही अंधांना सोपे जाईल, असे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्यात १३ हजार १९१ अपंग मतदार आहेत. यातील अंधत्व असलेल्या १,१५३ मतदारांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी अंध मतदारांसाठी ईव्हीएम मशीनच्या बाहेर पिवळ्या रंगाची ब्रेललिपीतील स्टिकरची पट्टी असे. अंध मतदारांनी त्या पट्टीवर हात फिरवल्यानंतर त्यांना मशीनवर कोणत्या नंबरवर कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत याची माहिती मिळे व ते मतदान करत, यात बराच वेळ जायचा, मात्र नवीन मशीनमध्ये ब्रेलची सुविधा असल्याने अंध उमेदवारांना थेट मशीनमध्येच उमेदवार तपासून मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

