नारीशक्तीच्या हातात नऊ मतदान केंद्र
अलिबाग, ता. १९ : महिलांचा सन्मान वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून फक्त महिला संचालित मतदान केंद्रे तयार केली जातात. बुधवारी (ता. २०) होणाऱ्या विधानसभा मतदानासाठी रायगड जिल्ह्यात नऊ सखी मतदान केंद्रे सुरू केली जाणार आहेत, तर सात मतदान केंद्रे ही युनिक मतदान केंद्रे म्हणून उभारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात विधानसभेसाठी एकूण २,७९० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यातील नऊ केंद्रांवरील सर्व जबाबदाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार, मतदान प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी स्वीप कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे व्यवस्थापन, तसेच नियोजन असलेले एक ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहे.
सखी मतदान केंद्रावर एक केंद्रप्रमुख, तीन किंवा चार निवडणूक कर्मचारी, एक पोलिस शिपाई अशा पाच ते सहा महिलांचा समावेश आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यात नऊ महिला नियंत्रित मतदान केंद्रे (सखी) स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात पनवेलमधील ११७ क्रमांकाचे खारघर येथील मतदान केंद्र, खोपोलीतील २८६ क्रमांकाचे केंद्र, उरणमधील २६७, तर पेणमधील तिवरे, आंबोले, रोहा तालुक्यातील कोलाड, अलिबागमधील १८२ क्रमांकाचे केंद्र, श्रीवर्धनमधील उतेखोल, महाडमधील २३० असे एकूण नऊ सखी मतदार केंद्रे असतील. निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या केंद्रांमध्ये तैनात पोलिसही महिला असतील.
आठ युवा संचालित मतदान केंद्रे
युवा मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यात आठ युवा संचालित मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यात ११८ क्रमांकाचे खारघरचे मतदान केंद्र, २९०- खोपोली, २५६- उरण व ९६- हाशाची वाडी, २८४ क्रमांकाचे नागोठणे, १७८- अलिबाग, ९६- तळा, महाडमधील १८२ क्रमांकाचे मोहोप्रे, अशी एकूण आठ युवा संचालित मतदार केंद्रे उभारण्यात आली आहेत.
अपंग संचालित सहा विशेष केंद्रे
अपंग मतदारांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात सहा अपंग संचालित मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात कर्जतमध्ये विधानसभा मतदारसंघातील ८१ क्रमांकाचा आनंदवाडी, १२७ क्रमांकाचा जासई , ९९ पेण नगर परिषद, १७९- अलिबाग, २५७- म्हसळा, ९५- गोरेगाव, अशी एकूण सहा दिव्यांग संचालित मतदार केंद्रे असतील.
----
रायगडच्या लोकसंस्कृतीचे दर्शन
जिल्ह्यातील वेगवेगळ्या सात मतदान केंद्रांवर विशेष सजावट केली जाणार असून या सजावटीतून रायगडची लोकसंस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. या मतदान केंद्रांवर मासेमारीचा देखावा, ऐतिहासिक देखावा उभारला जाणार आहे. त्याचबरोबर मतदारांना सेल्फी पॉइंट उभारले जातील. यात ११९ क्रमांकाच्या खारघर मतदान केंद्राचा समावेश आहे, त्याचबरोबर उरणमधील २९९ क्रमांकाचा बांधपाडा/कचरे पाडा, पेणमधील ३४- बळवली, १७२- अलिबाग, ३१८- श्रीवर्धन, महाडमधील ३३८ क्रमांकाचे पार्ले, अशी एकूण सात आदर्श संचालित मतदार केंद्रे असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

