सीसीटीव्हीचा प्रस्‍ताव धूळ खात

सीसीटीव्हीचा प्रस्‍ताव धूळ खात

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.११ : शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असताना, रायगड जिल्हा प्रशासन मात्र अद्याप याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अनुचित घटना घडल्‍याने शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दोन हजार ५२८ शाळांमध्ये किमान ३० हजार रुपयांचे युनिट बसवण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजनाकडे पडून आहे. तर मतदानासाठी बसवण्यात आलेली सीसीटीव्हीही आता काढण्यात आल्‍याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी १,६५३ मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाने सीसीटीव्ही बसवले होती; परंतु ही कायम ठेवण्यात आली नाही. मतदान होताच ती काढून नेण्यात आली. रायगड जिल्ह्यात खासगी शाळा शंभर टक्के सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहेत, तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मिळून जेमतेम ३०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. ज्या तालुक्यांमध्ये सीएसआर फंड उपलब्ध आहे, अशा शाळांमध्ये प्राधान्यक्रमाने सीसीटीव्ही बसवून घेण्याच्या सूचना प्राथमिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अद्यापही सीसीटीव्ही यंत्रणा नसलेल्या शाळांची संख्या मोठी आहे. निधीच उपलब्ध न झाल्‍याने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुरक्षेबाबत प्रशासन गंभीर नसल्‍याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील इमारतींची डागडुजी अनेक वर्षांपासून रखडली आहे. मोडकळीस आलेल्‍या शाळांमध्ये आपल्या मुलांना शाळेत सोडण्यास पालक तयार नसतात. काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थिनीवर घडलेल्‍या अतिप्रसंगांनंतर राज्‍यातील सर्व सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे.

दोन हजार ५२८ शाळांचा प्रस्ताव
जिल्ह्यातील पडक्या शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आधीच धोक्यात आली आहे. जिल्ह्यातील दुर्गम शाळांच्या दुरुस्तीचा भार माजी विद्यार्थी उचलतात. मात्र, आता सीसीटीव्ही यंत्रणेसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी पैसे जमवताना अडचणी येत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दोन हजार ५२८ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

-----
बदलापूर घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे झालेल्या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात सरकारकडून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हा त्‍यापैकीच एक पर्याय आहे. मात्र निधीअभावी जिल्‍ह्यातील आजही अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही.

रायगड जिल्ह्यातील दोन हजार ५२८ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजनाकडे पाठवण्यात आला आहे. यासाठी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे कोणत्याच शाळेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. काही तालुक्यांमध्ये असलेल्या कंपन्यांकडून किंवा माजी विद्यार्थ्यांकडून जर आर्थिक मदत मिळत असेल तर प्राधान्यक्रमाने सीसीटीव्ही यंत्रणा बसवून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

मतदान केंद्र ही नगर पालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असतात. एकूण मतदान केंद्राच्या ५० टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या होत्या. त्यानुसार शाळांमधील एक हजार ६५३ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आले होती. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सीसीटीव्ही काढण्यात आले.
- नितीन वाघमारे, निवडणूक अधिकारी, रायगड

शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुली झालेल्या अत्याचाराची माहिती आपल्या पालकांना देताना घाबरतात. मुलींनी तक्रार केली तरी ठोस पुराव्याअभावी आरोपींची सुटका होते. मोबाईलच्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. हे रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे गरजेचे आहे.
- अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप, महिला राज्य प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com