सुधागडात फणसवाडीतील सात गुरे दगावली
पाली, ता. १८ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील फणसवाडीतील सात गुरे अचानक दगावल्याची घटना गुरुवारी (ता. १६) घडली आहे. ही घटना समजताच शुक्रवारी (ता. १७) रायगड जिल्हा व सुधागड पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. आजारग्रस्त दोन गुरांवर उपचार केले. परंतु आजाराचे निदान समजू न शकल्याने त्यांचीही प्रकृती बिघडली आहे.
फणसवाडी येथील वसंत कानडे यांची दोन, संतोष शिंगरे-एक, संजय सावंत-एक, वसंत जाधव-एक, भरत मांडवकर-एक, नामदेव शिंदे-एक अशी एकूण सात गुरे अचानक पोट फुगून दगावली आहेत. तर राजेंद्र शिंदे यांची दोन गुरांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अलिबाग डॉ. अजय कांबळे, डॉ.अशोक गाडवे, डॉ. सुयोग म्हसकर, डॉ.प्रशांत कोकरे, डॉ.सविता राठोड, पर्यवेक्षक सचिन ओहोळ आदींनी ग्रामस्थांची भेट घेतली.
लसीकरण व उपाय
सुधागड पशुसंवर्धन विभागाने तत्काळ सर्व गुरांना लसीकरण करून जनावरांना बिल्ले मारले आहे, जेणेकरून किती गुरे या गावात आहे, त्याची नोंद राहील. त्याप्रमाणे जनावरांचे लसीकरण करता येईल आणि एकही जनावर लसीकरणपासून वंचित राहणार नाही. जी गुरे दगावली आहेत, त्या गोठ्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फवारणी करून घेणे अशा सूचना उपस्थित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. पशुपालकांना जंतुनाशक गोळी, कॅल्शियम पावडर, द्रवरूप कॅल्शिअम या औषधाचे वाटप झाले आहे. तसेच गावातील लोकांना रोग प्रादुर्भावासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे.
जनावर मेल्यानंतर सर्वप्रथम त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. सध्या हिरवळ कमी नसल्याने गुरे विषारी वनस्पती खातात. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता आहे.
- डॉ.प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी
फणसावाडीतील जनावरांची पाहणी केली एकूण पाच जनावरे मृत आढळली. त्यांचे शवविच्छेदन केले असून रोग निदानाकरिता नमुने पुण्यातील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवले आहे. दोन आजारी जनावरांवर उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांना रोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले असून खनिज मिश्रण, जंत नाशक गोळ्या, कॅल्शिअम द्रव वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीला गावातील प्रत्येक गोठा निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांना सूचना दिल्या.
- डॉ. अजय कांबळे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशू वैद्यकीय चिकित्सालय, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

