त्रिमूर्ती दर्शनासाठी घारापुरी सज्ज

त्रिमूर्ती दर्शनासाठी घारापुरी सज्ज

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी बेटावरील शिवभक्‍त मोठी गर्दी करतात. येथील
ब्रम्ह-विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीसह महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी हजारो भाविक येण्याची शक्‍यता लक्षात घेत जिल्‍हा परिषदेने जय्यत तयारी केली आहे. सकाळी साडेसहा वाजता घारापुरी बेटावरील मोराबंदर, राजबंदर, शेतबंदर येथील नागरिकांनी सामुहीक आरती केल्‍यावर दर्शनाला सुरुवात होईल. त्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत बेटावर उतरण्यास परवानगी दिली आहे. यासाठी मोरा आणि गेटवे येथून दुपारी साडेतीननंतर एकही प्रवासी बोट सोडू नये, अशा सूचना करण्यात आल्‍या आहेत. तसेच रात्र होण्यापूर्वी सर्व भाविकांना बेटावरून बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी नीलकमल बोटीला झालेल्‍या अपघातानंतर मेरिटाइम बोर्डाने सुरक्षेच्या अनेक उपाययोजना आखल्या आहेत. भाविकांना बोटीतून प्रवास करताना लाइफ जॅकेट घालावे लागणार आहेत, त्याचबरोबर जादा लाइफ जॅकेटचा साठा जेएनपीए येथे ठेवण्यात आला आहे. परतीच्या प्रवासात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी न घेण्याच्या सूचना केल्‍याचे घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले.
बेटावर गोड्या पाण्याची टंचाई असल्याने मोरा येथून पाणी नेण्याबाबत व्यवस्था केली आहे. वीज, आरोग्य, स्वच्छता, आपत्तीकालीन परिस्थितीत कोणत्याही अडचणी येऊ नये, यासाठी घारापुरी येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे कार्यालयात चार ते पाच वेळा बैठका घेत नियोजन करण्यात आले आहे. बैठकीला मोरा सागरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत कांबळे, घारापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, सदस्य सचिन लाड, सदस्या अरुणा घरत, भारती पांचाळ, नीता ठाकूर, भारतीय पुरातत्त्व विभाग अधिकारी, एलिफंटा गेट वे जलवाहतूक संस्थेचे पदाधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी मोहन करंदुले, घारापुरीतील व्यावसायिक प्रतिनिधी सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते.

जादा तिकीट दर आकारल्यास कारवाई
भाविकांना सुरक्षित जलवाहतुकीची सुविधा देण्यासाठी मोरा ते घारापुरी एकेरी तिकीट दर रुपये ६५ रुपये निश्चित केला आहे. तसेच दुहेरी तिकीट दर १३० रुपये आहे. यापेक्षा अधिक दर आकारण्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा सूचना मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याशिवाय गेट वे ऑफ, मांडवा, रेवस येथूनही भाविकही मोठ्या संख्येने घारापुरीत दर्शनासाठी जातात.

-----------

भाविकांच्या सुरक्षेसाठी बैठक
उरण (बातमीदार) : घारापुरी बेटावर भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्‍या आहेत. नागरी सुरक्षा दल, पोलिस विभाग, बंदर विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग सतर्क असून भाविकांनीही शांततेत दर्शन घ्‍यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बोटीतून प्रवास करताना भाविकांनी लाइफ जॅकेट वापरणे बंधनकारक आहे. परतीच्या प्रवासातही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊ नये, भाविकांना आरोग्य सुविधांबरोबरच पिण्याचे पाणी, स्‍वच्छतागृह आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
...............

किल्ले रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर
छत्रपती शिवरायांची अपार भक्ती असलेल्या किल्ले रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरात हजारो भाविक महाशिवरात्रीनिमित्त येतात. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या राजदरबारात उभे राहिल्यानंतर ईशान्यकडे नजर वळवली की ठळकपणे उठून दिसते ते दिमाखात उभे असलेले रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर. रायगडची अनेक स्थित्यंतरे पाहत हे मंदिर आजही दिमाखात उभे असून महाशिवरात्रीला शिवभक्‍त दर्शनासाठी आवर्जून येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com