

पाली, ता. ४ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील खेमवाडी गावाजवळ ताडाईचा दरा येथे शनिवारी (ता. १) दुपारी मोठा वणवा लागला होता. वणव्यात दोनशेहून अधिक आंबा, काजू, फणस, जांभूळ, निव व इतर झाडे खाक झाली. परिणामी, शेतकऱ्यांचे सहा ते सात लाखांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेतकरी सुदाम धायगुडे, किसन धायगुडे, अनंत धायगुडे, सौरभ धायगुडे व सुमित धायगुडे (सर्व राहणार खेमवाडी) यांचा ताडाईचा दरा येथील सर्व्हे नंबर १३२/१/१ जागेतील झाडांना अचानक आग लागली. यात फळधारणा झालेल्या आंब्याची व काजूची झाडे खाक झाली. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांनी त्यांच्या आंब्याच्या व इतर झाडांभोवती पूर्ण जाळरेषाही काढली होती, तरीही वणवा कसा लागला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धायगुडे यांनी वणवा विझवण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु आग इतकी प्रचंड होती, की काही क्षणात सर्व झाडे जळाली. मंगळवारी (ता. ४) तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व सरपंच यांना धायगुडे यांनी निवेदन देत नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
आंब्याची झाडे वणव्यामुळे जळाली असतील तर शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा. शिवाय, वणवे रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. ज्यांच्यामुळे वणवा लागत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे यांनी केली. वणव्यामुळे वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतो, शिवाय रानमेवाही खाक होत असल्याने आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधनही नष्ट होत आहे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.