

किहीमकिनारी घातली ‘ऑलिव्ह रिडले’ने अंडी
४० वर्षांनंतर आढळले कासवाचे घरटे; २४ तास पहारा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : दुर्मिळ होत चाललेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने किहीम समुद्रकिनारी अंडी घातली आहेत. मंगळवारी (ता. ४) दुपारी अंडी घातल्यानंतर मादी कासव समुद्रात निघून गेले. या अंड्यांचे योग्य पद्धतीने जतन करण्यासाठी कांदळवन कक्षाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. किहीम ग्रामपंचायतीने अंडी घातलेल्या ठिकाणी संरक्षण कुंपण घातले असून, तेथे २४ तास पहारेकरी ठेवण्यात येणार आहेत. अंडी उबवण्यासाठी साधारण ५० ते ५३ दिवसांचा कालावधी लागणार आहे, पिल्ले बाहेर निघण्याचा क्षण आनंदोत्सावाने साजरा केला जाणार आहे.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर वाढत्या प्रदूषणामुळे ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी नामशेष झाली आहेत, तर अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी घातल्याचे आढळून आले. या कासवांना हा समुद्रकिनारा आता सुरक्षित वाटू लागला असल्याचे कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विभागीय वन अधिकारी दक्षिण कोकण कांदळवन कांचन पवार, सहाय्यक वनसंरक्षण दक्षिण कोकण कांदळवन प्रियांका पाटील, अलिबाग कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्यासह किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड यांनी प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन पाहणी केली. वन विभागाच्या कांदळवन कक्षाने या अंड्यांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना आखल्या आहेत. कासवाच्या घरट्याच्या बाजूला कुंपण घालण्यात येणार असून, तेथे २४ तास पहारेकरी ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे घरटे आणि घरट्यातील अंड्यांचे जतन केले जाणार आहे. येथील काही स्थानिक जुन्या लोकांनी सांगितले की, यापूर्वी तिथे अशा प्रकारे कासवे अंडी घालण्यासाठी येत होती; मात्र वाढते प्रदूषण आणि वर्दळीमुळे बरीच वर्षे या किनाऱ्यावर कासवे आलीच नव्हती. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने किहीम समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी एक मशीन दिली असून, दररोज येथील कचरा उचलला जातो.
...
प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे येथील प्रदूषण कमी होत चालले आहे, हे या घटनेने दिसून आले आहे. रायगड जिल्ह्यात अशा प्रकारे नागरिकांना कुठेही समुद्रकिनारी कासवांची अंडी व घरटी दिसल्यास त्यांनी याबाबत वन विभाग कांदळवन विभागाला संपर्क साधावा. जेणेकरून कासवांचे संरक्षण करता येईल.
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष अलिबाग
...
या घरट्याच्या भोवताली तारेचे कुंपण घातले जाणार असून, २४ तास पहारा देण्यासाठी पहारेकरी ठेवण्यात येणार आहेत. मागील ३० ते ४० वर्षे येथे अशा प्रकारची घरटी कधीही आढळून आलेली नव्हती. आजची घटना आमच्यासाठी आनंदाची आहे. साधारण ५० दिवसानंतर या घरट्यातून बाहेर पिल्ले बाहेर पडणार असून, आम्ही आनंदोत्सव साजरा करणार आहोत.
- प्रसाद गायकवाड, सरपंच, किहीम ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.