पर्यावरणस्नेही होळीचा जागर
पाली, ता. ८ (वार्ताहर) ः होळी व धुळवड हा रंगांचा, आनंदाचा आणि नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण; पण या सणानिमित्त होणारी वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय व रासायनिक रंगांचा वापर ही एक गंभीर समस्या आहे. जिल्ह्यात यंदा पर्यावरणस्नेही होळीचा जागर पाहायला मिळणार आहे. या उपक्रमातून वृक्षसंवर्धन, गरिबांना अन्नदान, पर्यावरण जागृती आणि समाजसेवेचा संदेश दिला जाणार आहे. अनेक समाजसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व संवेदनशील नागरिक यासाठी विविध मार्गांनी पुढाकार घेत आहेत.
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते. फाल्गुन वद्य पंचमीला रंगांची उधळण केली जाते, म्हणून ती रंगपंचमी असते; पण या तिन्हींना ‘होळी’ म्हणून संबोधले जाते. जिल्ह्यात होळी, धुळवड म्हणजेच शिमगोत्सवाला कोकणात विशेष महत्त्व आहे.
होळी व धुळवड हे सण पर्यावरणपूरक साजरे करावे, तसेच ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ असे आवाहन रायगडमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत करण्यात आले आहे. पेण, नागोठणे, खोपोली, अलिबाग, रोहा आदी ठिकाणच्या अंनिसच्या शाळा असून हजारो पोळ्या जमा करून त्याचे आदिवासी वाड्यांवर वाटप करणार आहेत.
होळीला लावा झाडे
होळीला झाडे न तोडण्याचे आवाहन हभप महेश पोंगडे महाराज आणि इतरही अनेक संस्था-संघटनांनी समाजमाध्यमांवर केले आहे. होळीसाठी झाडे तोडली जातात म्हणून टीका होते; पण प्रत्यक्ष वृक्षलागवड आणि संगोपन म्हटले की फार कमी लोक पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक होळी
पर्यावरणाचे संवर्धन करीत परंपरा जपण्याचा प्रयत्न गणराज व डॉ. अर्चना जैन हे दाम्पत्य अनेक वर्षांपासून करीत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण अशा समस्या असताना मोठी होळी उभारण्याची स्पर्धा करणे चुकीचे आहे. सुधागड तालुक्यातील वावे गावात पारंपरिक पद्धतीने सुकी लाकडे, गवत, पेंढा रचून होळी लावण्यात येत असल्याचे स्थानिक तरुण केतन म्हस्के यांनी सांगितले.
वांगणी गावची पर्यावरणस्नेही होळी
होळी म्हणजे वृक्षतोड या पारंपरिक गैरसमजाला फाटा देत रोहा तालुक्यातील वांगणी गावातील ग्रामस्थ १२ वर्षांपासून होळीसाठी एकही जिवंत व हिरवे झाड न तोडता होळी साजरी करीत आहेत. होळीच्या चार-पाच दिवस आधी गावात दवंडी पिटून होळीसाठी झाडे न तोडण्याबाबत जनजागृती केली जाते. गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण याला प्रतिसाद देऊन होळीसाठी कोणतेही जिवंत झाड तोडत नाहीत. नैसर्गिकरीत्या व वादळात पडलेली, इतर कारणांनी वाळलेली झाडे थोड्या प्रमाणात वापरून प्रतीकात्मक होळी वांगणी गावात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
होळी म्हणजे वृक्षतोड या समीकरणाला विराम देऊन वृक्षसंवर्धनाचा एक सकारात्मक संदेश वांगणी तसेच जिल्ह्यातील काही ग्रामस्थ आपल्या कृतीतून सर्वांना देत आहेत. वांगणी ग्रामस्थांच्या कृतीचे व निर्णयाचे अनुकरण गावागावांत झाल्यास दरवर्षी होळीच्या निमित्ताने होणारी हजारो जिवंत वृक्षांची बेसुमार कत्तल थांबेल व आपली वसुंधरा पुन्हा हिरवीगार होईल. ठिकठिकाणी असा विधायक बदल घडताना दिसत आहे.
- टिळक खाडे, विज्ञान शिक्षक, वांगणी हायस्कूल
होळीसाठी झाडे तोडू नका. अनेक ठिकाणी होळी पेटवण्याऐवजी गावात एकाच ठिकाणी प्रतीकात्मक होळी पेटवा. होळीनिमित्त बोंबा मारणे, अपशब्द उच्चारणे यापासून कटाक्षाने लांब राहा. होळीमध्ये पोळी जाळण्याऐवजी ती पोळी गरजूंना द्या. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या व पर्यावरणस्नेही रंगांनी धुळवड व रंगपंचमी साजरी करा.
- मोहन भोईर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.