वणव्यामुळे सरसगड होरपळला

वणव्यामुळे सरसगड होरपळला

Published on

पाली, ता. ९ (वार्ताहर) ः सरसगड किल्ल्यावर शनिवारी (ता. ८) वणवा लागला होता. हा वणवा रात्री उशिरापर्यंत धुमसत होता. येथील वनसंपदा आणि पशु-पक्ष्‍यांचा अधिवास नष्‍ट झाला आहे. वन विभाग व स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
सरसगडावर वणवा लागल्याची माहिती मिळताच वनक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे व संतोष भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश दबडे, वनरक्षक विनोद चव्हाण, संकेत गायकवाड, संदीप ठाकरे, जितेंद्र शिंदे, वनमजूर नामदेव पुंजारे, गोविंद लांगी, पांडुरंग पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अमित निंबाळकर व मिलिंद गोळे यांनी वणवा विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सतत लागणाऱ्या वणव्यामुळे किल्ल्याचे आणि त्याच्या आसपासच्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज स्थानिक रहिवासी आणि दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.
वणवा विझवण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या अमित निंबाळकर यांनी सांगितले, की अनेकदा वणवे लावले जातात. त्‍यामुळे याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पाली किल्ल्यावर लागलेला वणवा विझवणे खूप कठीण होते. अंधारात कुठून जावे, हेच कळत नव्हते. ब्लोअर मशीन घेऊन वन विभागाचे पथक काम करीत होते, मात्र किल्‍ल्यावर मशीन नेताना अडचणी आल्‍या. आग विझवण्यासाठी आणलेल्‍या ओल्या फांद्या १० मिनिटांत जळाल्‍याचे निंबाळकर यांनी सांगितले.

अडचणींचा सामना
वणवा विझवण्यासाठी योग्य उपकरणे नसणे तसेच आगीचे रौद्र रूप, झाडी-झुडपे, तीव्र उतार आदी गोष्टींचा अडसर येतो. सरसगडावर अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन केले जात आहे, मात्र वणव्यांमुळे ही सर्व झाडे जळाली असून, वनौषधींचा ठेवा धोक्‍यात आला आहे. परिणामी वणवे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.

पाली ः वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सरसगडावरील वणवा विझवला.

...................

वणव्यामुळे बेघर झालेल्‍यांना पुनर्वसनाची आस
धामणसईतील ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन
रोहा, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील धामणसई येथील धनगरवाडा नावाच्या लोकवस्तीत गुरुवारी लागलेल्‍या भीषण वणव्यात ४८ घरे, १८ गोठे आणि तीन पडकी घरे बेचिराख झाली. या हृदयद्रावक घटनेमुळे धनगरवाडातील ग्रामस्‍थांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. वणव्यामुळे अन्न, वस्‍त्र, निवारा संपूर्ण जळून खाक झाल्याने शेकडो जण बेघर झाले. या ग्रामस्थांनी सरकारकडे लेखी निवेदन देत मदतीची याचना केली आहे. याच ठिकाणी सरकारने आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी बाधित ग्रामस्थांनी केली आहे.
धामणसई ग्रामपंचायत हद्दीतील धनगरवाडा हे गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. गुरुवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यात धनगरवाडा येथील ४८ घरे जळून बेचिराख झाली. आयुष्यभर घाम घालून उभा केलेल्या संसाराची क्षणातच राखरांगोळी झाली. या घटनेनंतर प्रत्येक घराचे पंचनामे झाले. त्यामुळे सरकारने मदत देण्यापेक्षा आम्हाला हक्काची घरे बांधून द्यावी, अशी विनंती ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी गंगाराम कोकळे, रामा बावदाने, मंगेश कोकळे, अनंता कोकळे, सुनील कोकळे, राम केंडे, लिंबाजी केंडे, जनार्दन कोकळे, राम कोकळे, तुकाराम कोकळे, भास्कर बावदाने, भगवान कोकळे, झिमा कोकळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गावात जाण्यासाठी रस्ता असता तर...
धनगरवाडा परिसरात वणव्यामुळे अनेक घरांची राखरांगोळी झाली. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, व्यवस्थित पायवाट नाही, म्हणून अग्निशमन दलाची गाडी गावात जाऊ शकली नाही. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता असता, तर इतके नुकसान झाले नसते, अशी भावना ग्रामस्‍थांकडून व्यक्‍त करण्यात आली.

रोहा ः वणव्यामुळे घरे बेचिराख झाल्‍याने ग्रामस्‍थ हवालदिल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com