चढत्या पाऱ्याने अंगाची काहिली

चढत्या पाऱ्याने अंगाची काहिली
Published on

चढत्या पाऱ्याने अंगाची काहिली
जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित; थंड हवेची ठिकाणेही तापली

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट पसरली आहे. दोन दिवसांपासून रायगडमधील सरासरी तापमान ३७ अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे जिल्ह्यातील माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणालाही उष्‍ण लाटेचा फटका बसत आहे, तर भिरा-पाटणूस परिसरात ४३ अंशापर्यंत पारा चढला आहे. या उष्‍ण लाटेने माणगाव, पोलादपूर, महाड, खालापूर, पाली या तालुक्यांना सर्वाधिक चटका बसत असून, दुपारच्या वेळी जनजीवन ठप्प झालेले दिसते.
जिल्हा आरोग्य विभागानेही उष्णतेपासून वाचण्यासाठी सावधानता बाळगण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. महत्त्वाच्या कामांशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आल्‍याने महामार्गावरील वाहतूक दुपारच्या वेळी थांबलेली दिसते. उष्णतेमुळे बाजारपेठांमधील उलाढालीलाही लगाम बसला आहे.
साधरणपणे शिमगोत्सवानंतर कोकणात उष्णतेची लाट येते, परंतु यंदा ही लाट लवकर आल्‍याने नागरिक हैराण झाले आहेत. शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांनाही घरात बसून उकाडा कमी होण्याची वाट पहावी लागत असून, फळे, शीतपेयांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

दिवसा चटका, रात्री उकाडा
कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट आहे. तसा अलर्ट भारतीय हवामान विभागानेही दिला आहे. कोकणात आर्द्रता असल्याने दिवसा उन्हाचा चटका, तर रात्री उकाडा जाणवत आहे. त्‍यात वीजपुरवठा खंडित झाल्‍यास घामाच्या धारांनी नागरिक बेजार होत आहेत.

वाहनांना आगी लागण्याच्या घटना
वाढत्या तापमानामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमध्ये कमालीचा उष्मा जाणवत आहे. यामुळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून भरधाव वाहने चालवणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. पेण रेल्वे स्थानक परिसरात उष्णतेची तीव्रता जाणवत असून, चार दिवसांपासून पारा ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. उष्णतेमुळे स्‍पार्क होऊन दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडतात. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

गवत पूर्णपणे सुकलेले आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील गारवाही कमी झाल्‍याने वणवे लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी जिल्ह्यातील काही शहरांमध्ये ४१ ते ४२ अंश सेल्‍सिअस तापमान नोंदवण्यात आले. तापमानवाढीमुळे जंगली जनावरेही तहानेने व्याकूळ होत आहेत. मनुष्यप्राणी या नैसर्गिक आपत्तीमध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल, परंतु पशु-पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी सर्वांना पुढाकार घ्यावे लागेल.
- सागर दहिंबेकर, अध्यक्ष, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था

रायगड जिल्ह्यात ६ ते १० मार्चदरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता मुंबई-कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी नागरिकांनी करणे आवश्यक आहे. उष्‍माघाताचा त्रास होऊ नये, म्‍हणून दुपारच्या वेळी बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
- संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी


उष्णतेपासून वाचण्यासाठी उपाययोजना
* तहान लागली असेल/नसेल तरी दर अर्ध्या तासाने थोडे थोडे पाणी प्यावे.
* घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
* दुपारी घराबाहेर जाणे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते तीन यादरम्यान उन्हात जाणे शक्यतो टाळावे.
* सुती, हलके, फिक्‍या रंगाचे कपडे घालावेत.
* लिंबू पाणी, ताक, कैरीचे पन्हे, ओआरएस इत्यादी द्रव्यांचे सेवन करावे.
* प्रवासात पाणी सोबत ठेवा : बाहेर जाताना पिण्याचे पाणी बरोबर घेऊन जावे.
* गुरांची काळजी घ्या : त्यांना पुरेसे पाणी व सावलीत विश्रांती मिळेल याची काळजी घ्यावी.


उष्‍माघातावर उपाय
* अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, किंवा सतत घाम येणे, ही उष्माघाताची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि रुग्णास थंड हवेत विश्रांती द्यावी.
* गर्भवती, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
*अतिश्रमाची कामे करू नयेत, उन्हात जड कामे करणे टाळावे.
* दारू आणि गरम पेये पिणे टाळावे. चहा, कॉफी आणि गोडसर थंडपेयांचा वापर कमी करावा.
* गडद रंगाचे आणि घट्ट कपडे घालणे टाळावे, अशा कपड्यांमुळे उष्णता वाढू शकते.
* लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना वाहनात एकटे सोडू नये, पार्क केलेल्या गाडीत त्यांना ठेवू नये.

जिल्ह्यातील तापमान (अंश सेल्सिअस)
अलिबाग - ३४
पेण- ३९
कर्जत- ३८
महाड - ४२
माणगाव- ४३
खालापूर - ३२
रेवदंडा - ३३
श्रीवर्धन - ३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com