बोधगया महाविहाराच्या मुक्तीसाठी अलिबागमध्ये रॅली
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १२ : बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशपातळीवर आंदोलन सुरू आहे. भारतीय बौद्ध महासभा उत्तर शाखा रायगड आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील बौद्ध समाज एकवटला असून, बुधवारी दुपारी अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅली बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले.
रॅलीमध्ये भारतीय बौद्ध महासभा रायगड (उत्तर) जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, कोषाध्यक्ष राजेंद्र पावसकर, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा उषा कांबळे, सरचिटणीस छाया गवई, कोषाध्यक्षा त्रिशला सावळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची सरकारने अद्याप दखल न घेतल्याने देशभरातील बौद्ध अनुयायांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाविहाराच्या मुक्तीसाठी बौद्ध समाज एकत्र आला आहे. अलिबागमधील रॅलीला बौद्ध अनुयायांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ मंडळींसह तरुण मंडळी रॅलीत सहभागी झाली होती. अलिबाग शहरातील हिराकोट तलाव या ठिकाणी रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले. त्यानंतर ज्ञानेश्वर गायकवाड, उषा कांबळे, दीपक गायकवाड आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन दिले. बोधगया महाविहार कायदा १९४९ रद्द करावा, महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशा अनेक मागण्या या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. मागण्यांची लवकरात लवकर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महाविहार मुक्तीसाठी अलिबागमध्ये धरणे
बोधगया महाविहाराचा ताबा पूर्णपणे बौद्धधर्मीयांना देण्यात द्यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा शाखेतर्फे शनिवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बोधगया हे जगातील सर्व बौद्धांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली होती. या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. पवित्र स्थळ असलेल्या बोधगया महाविहारावर काही मंडळींनी कब्जा केला आहे. त्यामुळे हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी देशभर आंदोलन करण्यात येत आहे. महाबोधी महाविहाराच्या जागेवर कब्जा केलेल्या महंताच्या खोलीत अद्याप बुद्धप्रतिमा, शिलालेख, अभिलेख आहेत. या ऐतिहासिक वास्तू पुरातत्त्व विभाग, बोधगया संग्रहालयात जमा करण्यात याव्यात, महाबोधी महाविहाराजवळ सम्राट अशोकाचा राजवाडा होता. तो शोधण्यात यावा आदी मागण्यांसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

