कृषी, शिक्षण क्षेत्राला मिळणार बळकटी

कृषी, शिक्षण क्षेत्राला मिळणार बळकटी
Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळांचे डिजिटलायझेशन, असंसर्गजन्य आजारावरील उपचारासाठी एनसीडी किट देण्यासाठी विशेष तरतूद करत रायगड जिल्हा परिषदेने स्वनिधीचा ८५ कोटी ८५ लाख ८५ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. प्रशासकीय राजवटीतील हा तिसरा अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात पाच कोटींची वाढ करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे, अशा मालमत्ता शोधण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला असून, त्‍यासाठी १० लाखांची तरतूद केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला, शेतकरी, दिव्यांग, आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, जिल्हा परिषद मालकीच्या इमारती व जागांचे जतन तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत प्राप्त करून देत विकास साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे, भरत बास्टेवाड यांनी भाषणात स्‍पष्‍ट केले.
जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मंगळवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, लेखाधिकारी सतीश घोळवे व शहाजी भोसले तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खातेप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मूळ अर्थसंकल्पात विभागनिहाय निधी (कोटींमध्ये)
इमारत व दळणवळण - २०.७४ लाख
सामान्य प्रशासन - २.४०
शिक्षण - ७.१६
पाटबंधारे -१.२९
सार्वजनिक आरोग्य - २.५२
ग्रामीण पाणीपुरवठा - ११.९०
कृषी - २.९२
पशुसंवर्धन - ३.४५
समाजकल्याण - १३.२८
दिव्यांग कल्याण - ३.३२
महिला व बालकल्याण- ६.६४
संकीर्ण - ४.२८
ग्रामपंचायत - २.२८


विशेष योजनांसाठी तरतूद (रुपयांत)
नवीन रस्त्यांची कामे - १० कोटी २१ लाख
जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे संरक्षण - १० लाख
ग्रामीण भागात लहान पुलांची दुरुस्ती - १ कोटी
बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती - ७८ लाख
प्राथमिक शाळांना सौरप्रणाली, सीसीटीव्ही - १ कोटी ९५ लाख
प्राथमिक शाळांना आरओ. वॉटर फिल्टर -२० लाख
प्राथमिक शाळांमध्ये प्रथमोपचार पेटी - २४ लाख ९८ हजार
रुग्णवाहिका इंधन, दुरुस्ती-देखभाल - ५० लाख
आधुनिक कृषी उपकरणे - ३० लाख
झाडावर चढण्याचे स्वयंचलित यंत्र - ५ लाख ९४ हजार
दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता - ३० लाख

१६८ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प
गतवर्षी २०२४-२५ मध्ये १६८ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्पही मंगळवारी मांडण्यात आला. यावर्षीच्या यशस्वी कामगिरीमध्ये जिल्हा परिषदेतील विविध विभागांना एकत्रित कामकाजासाठी इमारत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. कुंटे बाग येथे जवळपास सर्वच विभागांना इमारत उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कामकाज गतिमान झाले असून, नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. मागील आर्थिक वर्षासाठी ८० कोटी ८० लाख ८० हजारांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. २०२४-२५ चा अंतिम अर्थसंकल्प हा मूळ अर्थसंकल्पापेक्षा ८७ कोटी ५१ लाख ७० हजारांनी अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com