निधीअभावी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : आरोग्यसेवा पुरविणारे रायगड जिल्ह्यातील तीन हजार कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. निधीअभावी कर्मचाऱ्यांचे दोन-तीन महिन्यांपासून मासिक मानधन मिळालेले नाही. त्यामुळे महिन्याचा आर्थिक ताळमेळ जुळवताना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, त्यात शाळांना सुट्ट्या लागल्याने गावी जाण्याचे, फिरण्याचे बेत आखले जात आहेत, मात्र पगार न झाल्याने तीन हजार कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण होत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याची माहिती समोर येत आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशासेविका, डाटा ऑपरेटर, परिचारिका, आरोग्यसेविका, अकाउंटंट अशी वेगवेगळी पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यात आली. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो. आशासेविका घरोघरी जाऊन सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देतात. कुष्ठरोग शोधमोहिमेसह लसीकरण व इतर कामे तुटपुंज्या वेतनामध्ये आशासेविका करतात.
ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच उपचारासाठी संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. वेगवेगळ्या आजारांवर यांच्यामार्फत उपचाराची व्यवस्था करण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्यसेविका, सेवकांसह डाटा ऑपरेटरद्वारेदेखील आरोग्यसेवेचे काम करण्यात आले. आरोग्य विभागांतर्गत वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाइन प्रकारची कामे डाटा ऑपरेटरद्वारे केली जात आहेत, मात्र याच कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधनच मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काहींचे तीन महिने, तर काहींचे एक ते दोन महिन्यांचे मानधन थकीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते, मात्र दोन-तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. महिन्याचा घरखर्च चालविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यासाठी सरकारकडून निधीच उपलब्ध झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ऑनलाइनच्या युगात मानधनाची कामे जलद गतीने होण्याची अपेक्षा असताना ही कामे महिनोनमहिने प्रलंबित असल्याने सरकारच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
सलग सुट्ट्यांमुळे निधीस विलंब
जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन मिळावे, यासाठी सरकारकडून मागणी करण्यात आली आहे. तेथील अधिकाऱ्यांशी संपर्कदेखील साधण्यात आला आहे. दोन दिवसांत निधी येण्याची शक्यता आहे. सलग सुट्ट्या आल्याने अडथळा येत आहे. त्यानंतर तत्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यात मानधन जमा केले जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

