रायगडच्या राजकारणात उलथापालथ

रायगडच्या राजकारणात उलथापालथ

Published on

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. १५ : शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग या बालेकिल्ल्यातच घरघर लागली आहे. शेकापचे माजी आमदार सुभाष (पंडित) पाटील हे बुधवार (ता. १६) रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती ॲड. आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते भाजपत पक्षप्रवेश करत आहेत. शेकापमधील ही सर्वात मोठी फूट आहे. या पक्षप्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार निश्चित आहे.
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा महाराष्ट्रातील मार्क्सवादी राजकीय पक्ष आहे. पक्षाची स्थापना १९४८ मध्ये झाली होती. पक्षाचे १० हजार सदस्य असून, जयंत पाटील सरचिटणीस आहेत. त्यांचेच धाकटे बंधू सुभाष (पंडित) पाटील आणि भाचा ॲड. आस्वाद पाटील यांनी शेकापच्या डाव्या विचारसरणीचा त्याग करून भाजपसारख्या हिंदुत्व विचारसरणीच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. या पक्षप्रवेशाने रायगडच्या राजकारणावर मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. एकेकाळी राज्याच्या राजकारणात प्रमुखविरोधी पक्ष असलेल्या शेकापचे अस्‍तित्व रायगड आणि अलिबाग, पेण, पनवेल तालुक्यापुरते मर्यादित राहिले होते. अलिबाग हे मुख्य केंद्र होते; परंतु गतवर्षी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतून पाटील कुटुंबीयांच्या भावकीतील वाद विकोपाला गेला.

मीनाक्षी पाटलांच्या निधनानंतर कुटुंबात फूट
माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील या जयंत पाटील आणि सुभाष (पंडित) पाटील यांच्या बहीण होत्या. त्यांचे गतवर्षी २९ मार्चला निधन झाले. पक्षाची बांधणीमध्ये त्यांचा वाटा महत्वाचा होता. पाटील कुटुंबीयांमध्ये होणाऱ्या वादात त्या नेहमी सामंजस्याची भूमिका घ्यायच्या. एकाच कुटुंबात अनेक राजकीय पदे एकवटलेली असल्याने या कुटुंबात वादाच्या नेहमीच ठिणग्या पडत असत. मीनाक्षी पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम केले होते. तसेच काम त्यांनी रायगड जिल्ह्यातही केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान
१९५२ मध्ये शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकापचे २८ आमदार निवडून आले होते. हे सातत्य शेकापला फारकाळ टिकवता आले नाही. तरीदेखील महाराष्ट्राच्या राजकारणातील समाजवादी विचारधारेचा पक्ष म्हणून शेकापला वेगळे स्थान होते. आजतागायत रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार सातत्याने निवडून येत आहे. रायगड जिल्हा परिषद सातत्याने शेकापच्या ताब्यात राहिली आहे. त्याचबरोबर विविध सहकारी संस्था, शिक्षण संस्था, बाजार समित्या आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अशा संस्था शेकापच्या आतापर्यंत ताब्यात आहेत. आमदार गणपतराव देशमुख यांनी तर सांगोला विधानसभेतून सतत ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे.

अलिबागमधील वादाचे कारण
विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटुंबात वादाची ठिणगी पडली. माजी आमदार सुभाष पाटील आणि जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण दोघांनाही डावलून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले सुभाष (पंडित) पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम झाला. पक्षांतर्गत नाराजी चित्रलेखा पाटील यांना महागात पडली. शिवसेनेचे महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे पक्षाची वाताहत सुरू झाली. पक्षात आम्हाला विचारले जात नसल्याचे कारणं मतदारसंघातील कार्यकर्ते देत असत.


शेकापची अस्‍तित्‍वासाठी लढाई
शेतकरी कामगार पक्षाची धुरा समर्थपणे संभाळणारे पाटील कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून, त्यांचा भाऊ माजी आमदार सुभाष पाटील हेदेखील पक्ष सोडणार आहेत. येत्या १६ एप्रिलला ते आस्वाद पाटील, चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

सत्ता समीकरणे बदलणार
पक्षात सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. हा गटही दोघांसोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. याचे पडसाद आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहेत. मागील जिल्हा परिषदेमध्ये शेकापने राष्ट्रवादीबरोबर युती करून सत्ता मिळवली होती. आठ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला केवळ तीन जागा मिळवता आल्या होत्या. आताची स्थिती भाजपला पोषक असून, हीच संख्या ३० च्या पेक्षा जास्त जाऊन भाजप एक हाती सत्ता मिळवेल, असा विश्वास भाजपचे दक्षिण रायगड प्रमुख ॲड. महेश मोहिते यांचा आहे.

शेकाप स्थापनेचा इतिहास
शेतकरी आणि कामगारांच्या समस्या मांडणे गरजेचे असल्याचे काँग्रेसच्या काही नेत्यांचा आग्रह होता. त्यास काँग्रेसमधून प्रचंड विरोध होता, तरीदेखील विरोधाने खचून न जाता पुण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी केशवराव जेधे, औटे, मोहिते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करून शंकररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामकरी’ऐवजी नवा ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा निश्चय केला. त्यानंतर २ व ३ ऑगस्ट १९४७ रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे-केशवराव जेधे यांनी निवडक कार्यकर्त्यांची सभा घेतली. सभेला जी. डी. लाड, के. पा. खडके, कृष्णराव धुडूप, मुळीक, शिरोळे, नाथाजी लाड, बाबूराव जेधे उपस्थित होते. याच बैठकीत ‘शेतकरी कामगार पक्ष’ महाराष्ट्रात जन्मास आला.


भाजपचे प्रदेशचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण नुकतेच अलिबागला आले होते. त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा झाली. पक्षात तुमचा योग्य सन्मान राखला जाईल, अशी हमी दिली आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपची ताकद बरोबर असल्यास जिल्ह्यातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावू.
- सुभाष (पंडीत) पाटील, माजी आमदार

शेकापला वैचारिक बैठक आहे, ती कोणीही नष्ट करू शकत नाही. काहींना पक्षात राहून काम करणे अवघड जात असेल, तर वेगळा मार्ग निवडण्याचा त्यांचा तो अधिकार आहे. यानंतर शेकाप यातूनही भरारी घेईल, असा आम्हाला विश्वास आहे.
- जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com