मधमाशांच्या संख्येत घट
औषध फवारणी, मोबाईल लहरींमुळे मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात
जेमतेम २० टक्क्यांवर मध उत्पादन; आदिवासींच्या उपजीविकेवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० : मधमाशी हा पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, जीवसृष्टीला मिळालेले वरदान आहे. परागी भवनातून शेती उत्पन्न ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे काम मधमाश्या करतात. या कामातून मधासारखा अन्नाचा प्रमुख स्रोत निर्माण करतात; मात्र जंगलतोड, शेतीपिकावर होणारी रासायनिक फवारणी आणि निसर्ग, तौक्तेसारख्या सातत्याने येणाऱ्या चक्रीवादळाने मधमाश्यांवर संकट ओढावले आहे. याचा परिणाम नैसर्गिक अधिवासात तयार झालेल्या मधाची विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या उपजीविकेवरही होत आहे.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, मधमाश्या नष्ट झाल्या, तर मनुष्यप्राणी जेमतेम चार वर्षे टिकाव धरू शकेल. इतके अनन्यसाधारण महत्त्व असतानाही कोकणात मधमाश्यांचा अधिवास सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. कोकणात जंगलपट्ट्यातील आदिवासी बांधवांचे मध संकलन करणे हा प्रमुख व्यवसाय आहे. आतापर्यंत त्यांच्या शेकडो पिढ्या मध संकलनावर उपजीविका करत होत्या, मात्र सततच्या जंगलतोडीमुळे अलीकडे हे प्रमाण खूपच कमी झाल्याने व्यवसाय संकटात आला आहे. राहिलेली कसर चक्रीवादळाने भरून काढली. उंच उंच झाडे उन्मळून पडल्याने मधमाश्यांचे पोळेही नष्ट झाले. मोबाईल लहरींचाही मधमाश्यांवर विपरीत आघात होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शेखर नाईक यांनी सांगितले. १०-१५ वर्षांपूर्वी जंगल भागात जितके मध मिळायचे, त्याच्या २० टक्केदेखील मध शोधून सापडत नसल्याने आमच्या उपजीविकेवरही परिणाम झाल्याचे धर्मा पारधी यांनी सांगितले.
मधासाठी पोळे जाळण्याचा प्रकार
रायगड जिल्ह्यात एकाच हंगामात, बहुतांश पावसाळ्यात पीक घेण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उन्हाळात मधमाश्यांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नाही. मधमाश्या अन्नाच्या शोधात पाच-सहा किलोमीटर परिसरात भटकतात. ठिकठिकाणी भूछत्राप्रमाणे उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आगीच्या घटना, वणव्यांमुळे मधमाश्यांचे पोळे नष्ट होते. आगीचे लोट पसरताच मधमाश्या बेचैन होऊन पोळ्यातून बाहेर पडतात. मध काढण्यासाठी काही जण पोळे जाळत असल्याने मधमाश्या मरतात.
मधमाश्यांचे प्रकार
एपीस मेलीफेरा : इटालियन मधमाशी म्हणूनही ओळखले जाते. या मधमाशीची लांबी ८ ते १३ मिमीपर्यंत असते. या मधमाशा कृत्रिम प्रकारे करण्यात येणाऱ्या मधमाश्यांच्या पेट्यांमध्ये पाळल्या जातात. अलीकडे कृत्रिम पेट्यांमध्ये मधमाश्या पाळण्याचे प्रमाण वाढत असले तरी, ते काही ठरावीक क्षेत्रापुरते मर्यादित आहे.
एपिस डॉरसॅटा : स्थानिक भाषेमध्ये हिला आगीमाशी किंवा आगी मधमाशी म्हणून ओळखले जाते, तर पोळ्याला ‘आगी मोहोळ’ म्हणतात. कोकणातील जंगल भागात बहुतांश याच मधमाश्या आढळतात. झाडांवर, शहरांतील उंच इमारती, जलकुंभाजवळ या मधमाश्यांचे पोळे दिसतात. ही मधमाशी सर्वात मोठी असून, हिची उंची १८ ते २१ मिमी असते. औषध फवारणी, मोबाईल लहरींमुळे याच मधमाशीला सर्वाच जास्त परिणाम भोगावे लागत आहेत.
एपिस फ्लोरिया : फुलेरी मधमाशी म्हणून ओळखली जाणारी ही मधमाशी आकारमानाने सर्वात लहान असून, तिची उंची ८ ते १३ मिमी असते. या मधमाश्या उघड्यावर पोळे बांधतात. या मधमाशीचे पोळे विशेषतः उंच झाडांवर पाहायला मिळते.
एपिस सेराना इंडिका : स्थानिक भाषेत हिला सातेरी मधमाशी म्हणून ओळखले जाते. या मधमाश्या आकारमानाने मध्यम असून, उंची १० ते १६ मिमी असते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील डोंगरकपारीत मधमाश्यांचे पोळे दिसून येतात. अन्नाच्या अभावामुळे सातेरी जातीच्या मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मधमाशी दिवसाचे महत्त्व
२० मे हा दिवस जागतिक मधमाशीदिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिका पालन तज्ज्ञाचा २० मे १७३४ रोजी स्लोव्हनियामध्ये गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांनी १७६६ मध्ये युरोपात पहिले मधमाशी पालन केंद्र सुरू केले. १७७१ मध्ये त्यांनी मधुमाशी पालनावरील पहिले पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २० मे २०१८ पासून २० मे हा दिवस जागतिक मधमाशीदिन म्हणून घोषित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.