थायरॉईडबाबत जागरूकता आवश्यक
अमित गवळे, पाली
काही वर्षांपासून थायरॉईडच्या रुग्णांत वाढ झाली आहे. या आजाराबाबत जनजागृती करणे, योग्य निदान आणि उपचार पद्धतींबद्दल माहिती मिळावी, यासाठी दरवर्षी २५ मे हा दिवस जागतिक थायरॉईडदिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्ल्यूएसओ) अहवालानुसार, जगभरात सुमारे २० कोटी लोक थायरॉईडग्रस्त असून, त्यात अंदाजे ४२ लाख भारतीयांचा समावेश आहे.
थायरॉईड आजाराबाबत संपूर्ण आकलन व जागरूकता महत्त्वाची आहे. आजाराचे निदान वेळीच न झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. बऱ्याचदा या आजारावर उपचार घेण्यासाठी कोणत्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावे, कोणती उपचारपद्धती आवश्यक आहे, कोणती खबरदारी घ्यावी आदी गोष्टींबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमजही आहेत.
नियमित औषधोपचार आवश्यक
माझ्या १३ वर्षांच्या मुलीला काही महिन्यांपूर्वी थायरॉईडचे निदान झाले. सुरुवातीला खूप भीती वाटली. या आजारावर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर कुठे उपलब्ध होतील, याबाबत माहिती नव्हती. गुगल आणि इतर ठिकाणांहून माहिती घेतल्यानंतर पनवेल येथे एका रुग्णालयात उपचार सुरू केले. आता नियमित औषधोपचार सुरू आहेत. रोज मुलीला सकाळी थायरॉईडची गोळी खावी लागते, मात्र हा आजार केव्हा बरा होईल, याबाबत चिंता वाटत असल्याचे पालीतील थायरॉईडग्रस्त मुलीच्या आईने सांगितले.
थायरॉईडची लक्षणे दिसूनही बऱ्याचदा उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते. योग्य माहिती आणि सावधगिरीने या आजारावर मात करता येते. थायरॉईडग्रस्तांनी संतुलित आहार घ्या, ज्यात सी-फूड, दुधाचे पदार्थ, अंडी, बदाम आणि सोयाबीन यांचा आहारात समावेश करावा. योग्य प्रमाणात आयोडीनयुक्त मीठ वापरावे. नियमित व्यायाम व योगा करणे. तसेच ३० वर्षांवरील सर्वांनी वार्षिक थायरॉईडबाबत तपासणी अवश्य करून घ्यावी. मद्यपान व धूम्रपान आदी व्यसनांपासून दूर राहावे.
- डॉ. मयूर कोठारी, पाली
थायरॉईड नेमके काय?
थायरॉईड ही ग्रंथी घशाच्या पुढील भागात स्वरयंत्राच्या खाली स्थित आहे. ही अंतःस्रावी ग्रंथी आहे, जी थायरॉक्सिन (T४) आणि ट्रायआयोडोथायरोनिन (T३) हे हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेचे (Metabolism) नियमन करतात, ज्यामुळे शरीराची ऊर्जा वापराची क्षमता, हृदयाची गती आणि रक्तदाब, शरीराचे तापमान नियंत्रण, मेंदूचा विकास आणि कार्यक्षमता व पचनसंस्था, स्नायू आणि हाडांचे आरोग्य सुरळीत चालते, परंतु थायरॉईड हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास वजनात अचानक बदल, थकवा, मानसिक ताण, हृदयरोग, अनियमित पाळी यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
थायरॉईड रोगांचे प्रकार आणि त्यांची लक्षणे
हायपोथायरॉईडिझम ः मुख्य कारण आयोडीनची कमतरता, ऑटोइम्यून डिसऑर्डर (हॅशिमोटो थायरॉईडिटिस), शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी.
लक्षणे ः वजन वाढ, सतत थकवा आणि झोप, त्वचेचा कोरडेपणा, केसगळती, मानसिक निष्क्रियता आणि डिप्रेशन, स्नायू दुखणे, सांधेदुखी व मासिक पाळीत अनियमितता.
हायपरथायरॉईडिझम ः मुख्य कारण ग्रेव्स डिसीज (ऑटोइम्यून विकार), थायरॉईडमधील गाठी, जास्त आयोडीन सेवन.
लक्षणे : वजनात झपाट्याने घट, हृदय गती वाढ, घाम फुटणे आणि असह्य उष्णता वाटणे, चिंता आणि घबराट व डोळे बाहेर येणे.
गॉईटर (थायरॉईडची सूज)
मुख्य कारण ः आयोडीनची कमतरता, थायरॉईडमधील गाठी, ऑटोइम्यून आजार.
लक्षणे : गळ्याच्या पुढील भागात स्पष्ट सूज आणि गिळताना किंवा श्वास घेताना त्रास.
थायरॉईड कॅन्सर
मुख्य कारण ः जनुकीय प्रवृत्ती, रेडिएशन एक्सपोजर.
लक्षणे : गळ्यात कठीण, वेदनारहित गाठ, आवाज बदलणे किंवा घसा खवखवणे व श्वास घेण्यास त्रास.
निदान
रक्त तपासणी : हार्मोन्सची पातळी तपासली जाते. अल्ट्रासाउंड/सोनोग्राफी थायरॉईडमधील गाठी किंवा सूज तपासण्यासाठी. तसेच कॅन्सरची शंका असल्यास गाठीचे नमुने घेतले जातात. याशिवाय रेडिओआयोडीन स्कॅन हायपरथायरॉईडिझमच्या निदानासाठी केले जाते.
उपचार पद्धती
हायपोथायरॉईडिझमसाठी लेवोथायरॉक्सिन हे हार्मोन रिप्लेसमेंट औषध दिले जाते, तर हायपरथायरॉईडिझमसाठी अँटी-थायरॉईड औषधे, रेडिओआयोडीन थेरपी किंवा शस्त्रक्रिया केली जाते आणि गॉईटर/कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया करून थायरॉईडचा भाग किंवा संपूर्ण ग्रंथी काढली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.