गायरान जमिनीवरील अतिक्रमण ‘जैसे थे’

गायरान जमिनीवरील अतिक्रमण ‘जैसे थे’

Published on

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. २७ : रायगड जिल्ह्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले असून गावठाणाला लागून असलेल्या गायरान जमिनीवर अतिक्रमण वाढत आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे स्वतःहून हटवण्याचे आदेश तीन वर्षांपूर्वी न्यायालयाने दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तीन हजार ९३५ ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या; परंतु तीन वर्षांत जिल्हा प्रशासनाला एकही अतिक्रमण हटवता आलेले नाही.
गाव पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाने गावाजवळ कोट्यवधी रुपयांच्या गायरान जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी जेव्हा गायरान जमिनी मोकळ्या करण्याचे आदेश देण्यात आले, त्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. त्यामुळे मतदार नाराज होतील, याचे कारण सांगत गावपुढाऱ्यांनी राजकीय लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला, त्यामुळे ही कारवाई रेंगाळत गेली. ती अद्यापपर्यंत सुरूच झालेली नाही.
रायगड जिल्ह्यात ९९.८० हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. ही सर्व जागा सरकारला रिकामी करून हवी आहे. यापैकी साधारण २० हेक्टर सरकारी जमिनीवर अतिक्रमण अलीकडच्या काळात करण्यात आल्‍याचे महसूलच्या अहवालावरून दिसून येत आहे. गावपुढाऱ्यांनीच प्लॉटिंग करून सरकारी जमीन विक्रीचे व्यवहार पूर्ण केले. प्रति गुंठा दोन ते पाच लाखांपर्यंत या विक्री व्यवहारांमधून गावपुढाऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचा अंदाज आहे. नव्याने अतिक्रमण करून घरे बांधणारे बहुतांश नागरिक बाहेरील आहेत. त्यामुळे त्यांना जमीन आणि पैसे गमावण्याची भीती सतावू लागली आहे. नव्याने अतिक्रमण झालेल्या जमिनीबाबत न्यायालय कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाढीव गावठाण नसल्याने अतिक्रमण
पनवेल, खालापूर, कर्जत, अलिबाग या तालुक्यांमध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे. येथे राहण्यासाठी येणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना ग्रामस्थांनी जमिनी विकल्याने गावठाण विस्तारीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शंभरहून अधिक गावठाण विस्तारीकरणाची प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत गावातील मूळ निवासी नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळत नसल्याचे कारण देत लगतच्या गायरान जमिनींवर अतिक्रमण झाल्याची बाब समोर येत आहे. पाहणी करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांनीही यास दुजोरा दिला.

चार तालुक्यांमध्ये शून्य अतिक्रमण
काही तालुक्यांमध्ये अतिक्रमणाचे प्रकार वाढत असताना जिल्ह्यात असेही काही तालुके आहेत, ज्‍या ठिकाणी एकही अतिक्रमित बांधकाम नाही. अशा तालुक्यांमध्ये उरण, तळा, पोलादपूर आणि म्हसळा या तालुक्यांचा समावेश आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये फक्त नऊ अतिक्रमणे आहेत, तर सर्वाधिक ७९४ खालापूर, ७९३ कर्जत तालुक्यात आहेत. तर सर्वात जास्त अतिक्रमणाखालील क्षेत्र पनवेल तालुक्यात ३४ हेक्टर आहे.

गायरान जमिनीवरील अतिक्रमण (हेक्‍टरमध्ये)
तालुका/गायरान जमीन/विनापरवाना बांधकाम/अतिक्रमित क्षेत्र
अलिबाग/५९६/७०३/२५
पेण/३४/३५०/१२
मुरूड/३०३/६२/१
पनवेल/५५२/७२५/३४
उरण/२०८/००/००
कर्जत/३५२/७९३/१०
खालापूर/३१७/७९४/३
माणगाव/२१५/२१८/३
तळा/१३/०/००
रोहा/२५५/१६०/२
सुधागड-पाली/१५३/४५/५
महाड/१३७/७६/०.४६
पोलादपूर/२०/००/००
श्रीवर्धन/३०४/९/०.१४
म्हसळा/२०३/०/००
एकूण/३६७१/३९३५/९९.८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com