

पाली, ता. २७ (वार्ताहर) ः शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नगर पंचायतीमार्फत शहरांमध्ये घंटागाड्यांमधून कचरा संकलित केला जात असला तरी काही बेशिस्त नागरिक रस्त्यालगत कचरा टाकतात. हा कचरा रस्त्यावर पसरत असून दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या शहरात पाच घंटागाड्यांमधून दररोज कचरा गोळा केला जातो. त्यासाठी विभागनिहाय वेळाही निश्चित केल्या आहेत; मात्र तरीही अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात. प्रामुख्याने बल्लाळेश्वर नगरकडे जाणारा मार्ग, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी समाजभवनाशेजारी व पुढे, मधली आळी, रामआळी, जुने पोलिस स्थानक, आगर आळी आदी ठिकाणी रस्त्यालगत कचरा टाकण्यात येतो. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार आणि नागरिक घरात किंवा सोसायटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच रस्त्यावर टाकतात. तर काहीजण दिवसभर घरी नसल्यास जमा झालेला कचरा रस्त्यालगत टाकतात. परिणामी, कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व मोकाट जनावरांकडून कचरा रस्त्यावर पसरवला जात असल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. रस्त्यालगतचा कचरा गटारे, नाल्यांमध्ये जात असल्याने पावसाळी पाण्याचा निचरा होण्यातही अडचणी येत आहेत.
कचऱ्याचे वर्गीकरण आवश्यक
पाली नगर पंचायतीकडून नियमित कचरा उचलला जातो. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छताही केली जाते; मात्र नागरिक तसेच व्यापाऱ्यांनीही शिस्त पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कचरा संकलित करताना, ओला, सुका, घरगुती, घातक, प्लॅस्टिक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक कचरा असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. केवळ नगर पंचायतीवर अवलंबून न राहता, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास शहरातील कचराकोंडीचा प्रश्न नक्की सुटेल, असे नगर पंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
घातक कचरा
रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये दारू व बियरच्या बाटल्या तसेच घरगुती सामानही टाकण्यात येते. फुटलेल्या दारूच्या बाटल्या जनावरे, कुत्रे तसेच सफाई कर्मचाऱ्यांना लागून इजा होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पोटामध्ये घातक पदार्थ आणि प्लॅस्टिक गेल्यास त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
गटारे, नाले तुंबतात
पावसाळा लवकरच सुरू झाल्याने रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या गटारे व नाल्यांमध्ये जातात. त्यामुळे या ठिकाणी गटारे व नाले तुंबतात आणि दुर्गंधी व रोगराई पसरते. तसेच सफाई कामगारांचे कामदेखील वाढते. रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी नगर पंचायतीच्या माध्यमातून सूचना व माहिती फलक लावण्यात आले आहेत. जे लोक कचरा टाकतील, त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही फलकांवर नमूद केले आहे; मात्र काही नागरिक सूचना फलकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
पाली नगर पंचायतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहर कचराकुंड्यामुक्त केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपला कचरा येणाऱ्या घंटागाडीतच टाकावा. जेणेकरून आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील. हटवण्यात आलेला कचरा रस्त्यावर टाकताना आढळल्यास घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार, कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत.
- प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, पाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.