किनाऱ्यालगतच्या गावांना उधाणाचा फटका
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : पावसाळ्यातील पहिल्याच उधाणाने किनारपट्टीवरील नागरिकांची झोप उडवली आहे. अलिबाग, पेण, उरण आणि मुरूड तालुक्यातील समुद्रकाठच्या अनेक गावांमधील उधाणाचे पाणी कमी झालेले नाही. ४.७५ मीटर उंचीच्या लाटा आणि ताशी ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे येथील घरांना तडाखा बसला आहे. त्यामुळे त्यांनी सुरक्षित स्थळी निवारा शोधला आहे.
सरकार दरबारी नैसर्गिक आपत्ती म्हणून उधाणाची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या उधाणाच्या वेळापत्रकात सोमवारी (ता. २६) ४.७५ मीटर उंचीच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवला होता, मात्र उधाणापासून बचावासाठी किंवा नागरिकांना आधार घेण्यासाठी कोणत्याही उपाययोजना न केल्याने बहुतांश नागरिकांनी चार ते पाच दिवसांपूर्वीच गाव सोडून शहरातील नातेवाइकांकडे आधार घेतला.
अलिबाग तालुक्यातील धेरंड, शहापूर, रांजणखार, डावली, मिळकतखार, कोप्रोली तर पेण तालुक्यातील वाशी, वढाव, लाखोले, घोडाबंदर, तामशीबंदर, रावे, दादर, सोनखार, हमरापूर या गावांना बसला आहे. सध्या उधाणग्रस्त गावांमध्ये तुरळक लोकच राहात आहेत, तर किनाऱ्यालगतच्या २० हजार गावांना पिण्याचे पाणी, वीज, दळणवळण अशा सर्वच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यातील १८ दिवसांत १९ वेळा साडेचार मीटरपेक्षा उंच लाटांची शक्यता वर्तवली आहे. सर्वात मोठी लाट सोमवारी (ता. २६) दुपारी ४.७५ मीटरची आली होती, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. उधाणामुळे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास गावातील शाळेत आश्रय घेण्याचे आवाहन नागरिकांना केल्याची माहिती डावली रांजणखारच्या ग्रामसेविका निशा चंदनकर यांनी दिली.
लाटांमुळे नासधूस
रायगड जिल्ह्यात एकूण १६५ खारभूमी योजना आहेत. या योजनांची सद्यःस्थिती काय आहे, याचा अहवाल गावच्या पोलिस पाटलांनी पाठवावा, अशा सूचना खारभूमी विभागाने दिल्या आहेत. उधाणाच्या लाटांमुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील सिमेंटच्या भिंतीची पडझड झाली आहे. पर्यटकांना बसण्यासाठी केलेल्या निवारा शेडच्या लाद्या उखडल्या आहेत. अनेक ठिकाणी संरक्षण भिंतीला भगदाड पडल्याचे दिसून येत आहे. वरसोली येथील ग्रोव्हन्स बंधाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.
मुरूड समुद्रकिनाऱ्यावर टाकलेला वाळूचा भराव वाहून गेला. दिवेआगर समुद्रकिनाऱ्याचेही नुकसान झाले, काशीद समुद्रकिनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप झाल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांची आहे. याचबरोबर लहान जेट्ट्यांचेही नुकसान झाले आहे.
खारेपाटातील नागरिकांच्या समस्या सरकार दरबारी मांडणारेही कोणीही नाही. एका बाजूला पावसाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूने उधाणाचा मारा झेलत येथील नागरिक जगत आहेत. खारभूमीच्या होणाऱ्या नुकसानीचे सर्व्हे करावे, अशी खारेपाट विभागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, परंतु खारभूमी विभागाचे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किनारी भागात होणारे नुकसानीबाबत माहिती समोर येत नाही. निदान आतातरी खारभूमी विभागाने नुकसानीची पाहणी करावी.
- राजन
भगत, समन्वयक, श्रमिक मुक्त दल
उधाणामुळे रात्री वीज नव्हती, पिण्याचे पाणी नव्हते. अशा परिस्थितीत रात्रभर घरात होतो. उधाणाच्या लाटांना माऱ्यामुळे घरांचे दरवर्षी नुकसान होत असल्याने बहुतांश लोकांनी शहरात घरे घेतली आहेत. दर पावसाळ्यातील हीच परिस्थिती असल्याने तक्रारी कोणाकडे करायच्या, असा प्रश्न येथील नागरिकांना पडतो.
- जीवन पाटील, शिवसेना, अलिबाग तालुका संघटक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

