अखेरच्या टप्प्यात पर्यटनाला उधाण
अमित गवळे, महाड
जैवविविधतेने नटलेले विलोभनीय निसर्गसौंदर्य व २४० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, तसेच ऐतिहासिक व धार्मिक स्थळे यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. संपूर्ण मे महिन्यात पावसामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. तसेच उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. उन्हाळी पर्यटनाचा हा अखेरचा टप्पा असून चार ते पाच दिवसांनी पर्यटकांची पावले परतीच्या मार्गाला लागतील.
पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळतात. यंदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंतदेखील पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती; मात्र सध्या सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, लहान-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली राज्य महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर आदी महामार्गांवर गर्दी होत आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील पाहायला मिळत आहे.
-------------------
या ठिकाणी गर्दी
जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरानला पर्यटक आता गर्दी करीत आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर. सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत. राज्याभिषेक दिनीदेखील रायगडावर हजारो शिवप्रेमी आले होते. कुलाबा किल्ल्यावर गर्दी आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरला पर्यटकांसह भाविकांचीही पसंती असते. एकाच ठिकाणी भव्य समुद्रकिनारा आणि देवदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम तेथे साधता येतो.
-----------------
समुद्रकिनारे फुल्ल
अलिबाग-नागाव, वरसोली, मुरूड-काशिद, श्रीवर्धन-दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हे सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले आहेत. घोडागाडी, एटीव्ही राईड्स, घोडा व उंट सफारीचा पर्यटक आनंद घेत आहेत.
----------------
पावसामुळे मे महिन्यामध्ये बरेच दिवस पर्यटकांनी पाठ फिरवली होती. आता उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सरत आहे. त्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी होत आहे. पर्यटक समुद्रकिनारी राहणे व मजा करणे पसंत करतात. अनेकांनी आगाऊ बुकिंग केले आहे. राहणे व खाण्याच्या किमतीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अल्प वाढ झाली आहे.
- सिद्धेश कोसबे, सरपंच व व्यावसायिक, दिवेआगर
----------------
उन्हाळी सुट्ट्या काही दिवसांनी संपणार आहेत. त्यामुळे कुटुंब व मित्रपरिवारासमवेत रायगड जिल्ह्यामध्ये फिरायला आलो आहे. येथील दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, तसेच अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली व महाड येथे भेट दिली.
- अनंत पाटील, पर्यटक, चोपडा, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.