मानवी वस्‍तीत मगरीचे घरटे, पिल्‍ले

मानवी वस्‍तीत मगरीचे घरटे, पिल्‍ले

Published on

मानवी वस्‍तीत मगरीचे घरटे, पिल्‍ले
माणगाव वनविभागाचे संवर्धनात्मक पाऊल

माणगाव, ता. १७ (वार्ताहर) ः महाड, माणगाव तालुक्‍यातील नद्यांमध्ये मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आढळला आहे. अनेकदा या मगरी मानवी वस्तीमध्ये शिरल्‍याचेही प्रकार पाहायला मिळाले आहेत. माणगाव तालुक्यातील खांदाड गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदीकिनारी मगरीचे घरटे आणि पिल्‍ले आढळली. रविवारी (ता. १५) माणगाव वनविभाग व स्थानिक वन्यजीव रक्षकांनी मगरीचे घरटे व तिच्या पिल्लांना संरक्षित केले आहे.
नदीकिनारी आढळलेल्या घरट्यामध्ये मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत. खबरदारी म्हणून माणगाव वनविभागाने तत्परतेने घरटे सुरक्षित केले आहे. जेणेकरून मगरीला व तिच्या पिल्लांना कोणतीही इजा पोहोचणार नाही. तसेच मोठ्या मगरीपासून पिल्लांच्या बचावाकरिता, नागरिकांवर मगर हल्‍ला करणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. हा परिसर वन विभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आला आहे. त्या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आला आहे. मगरीचे घरटे सुरक्षित करण्याकरिता माणगाव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, वनपाल ज्ञानदेव सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पवन चौधरी व वनमजूर गणेश शिर्के, सुनील तोंडलेकर, अनिल पवार, रूपेश हिलम व बाळू जाधव यांनी योग्य कार्यवाही केली आहे.


पावसाच्या दिवसांमध्ये मगरी नदीमध्ये येत असणाऱ्या मोठ्या पुरामुळे त्‍या ओढा, नाले, शेतजमिनीत घुसतात. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील नागरिकांमध्ये दहशत पसरते. मगर आढळल्‍यास कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता लागलीच वन विभागाकडे किंवा स्थानिक बचाव पथकांकडे त्वरित संपर्क साधावा.
- शंतनू कुवेसकर, वन्यजीव अभ्यासक, माणगाव

किनाऱ्यालगतच्या नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घ्यावी. पूरपरिस्थितीमुळे, मगरी-साप तसेच इतर वन्यजीव मानव वस्तीत आश्रयासाठी येतात. अशावेळी नागरिकांनी खबरदारी घेऊन त्वरित वन विभागाकडे संपर्क साधावा. वन विभाग वन्यजीव व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.
- प्रशांत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, माणगाव

मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर
माणगाव तालुक्यात काळ नदीमध्ये अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे. काळ नदीकिनारी त्यांना मुबलक खाद्य असून त्यांना नैसर्गिक अधिवास मिळत आहे. माणगाव शहरातील नागरीकरण दिवसेंदिवस वाढत असून वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. परिणामी, मगर, पिसोरी हरीण, साप आदी वन्यजीवांचा अधिवास मानव वस्तीनजीक दिसून येत आहेत. गतवर्षी शहरात एका अपार्टमेंटमध्ये आढळलेल्या मोठ्या मगरीला रेस्क्यू करण्यात आले होते.

माणगाव ः खांदाड गावात काळ नदीकिनारी मगरीचे घरटे आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com