

नद्यांनी ओलांडली इशारा पातळी
रायगडमध्ये मुसळधार पाऊस; नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना, जनजीवन विस्कळित
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढत गेला. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सोमवारी रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सकाळी ८.०० वाजेपर्यंत सरासरी ८४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात प्रमुख रस्ते, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसाचा अलर्ट असल्याने अनेकांनी घराबाहेर पडण्याचेच टाळले.
अलिबाग तालुक्यातील किनारपट्टीवरील धेरंड, माणकुळे, बहिरीचा पाडा येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पेरणी केलेली भाताची रोपे पाण्याखाली गेल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. अचानक पावसाचा जोर वाढल्याने पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतीच्या कामावर परिणाम झाला. रोहा तालुक्यात अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. महाड तालुक्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. सध्यातरी कोणत्याही भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेले नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली आहे.
कुंडलिकेने ओलांडली इशारा पातळी
रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने कुंडलिका नदीचे पात्र ओसंडून वाहत होते. डोलवहाळ बंधारा येथे कुंडलिका नदीने २३.३० मीटर इतकी उंची गाठली. ही उंची इशारा पातळीपेक्षा ०.३० मीटर जास्त आहे. सोमवारी सकाळी ताम्हिणी घाट, पाटणूस परिसरात जोरदार पाऊस पडल्याने अंबा, कुंडलिका नद्यांच्या पातळीत वाढ झाली. रायगड जिल्ह्यातील २८ लघू पाटबंधाऱ्यांमधील पाणीसाठा वाढला आहे. देवकुंड, झेनिथ, सागरगड धबधबे ओसंडून वाहत आहेत. ताम्हिणी घाटातील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. पावसाचा आनंद लुटण्यासाठी ताम्हिणी घाटात पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढत आहे.
पर्यटनस्थळांवर बंदी घालण्याची मागणी
काशीद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर या प्रमुख किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या पावसाळ्यात वाढते. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या लाटांमुळे बुडण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. अशाच प्रकारे तलाव, धबधबे, धरणांमध्ये बुडण्याच्या दुर्घटना घडत असतात. माथेरान येथे तीन तरुण बुडून मृत्युमुखी पडण्याची घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळावर निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.
नद्यांची पाणी पातळी (सोमवारी दुपारी ३.३०पर्यंत)
नदी/ इशारा पातळी/धोका पातळी/ सध्याची स्थिती
सावित्री/ ६.०० मी./ ६.५० मी. /३.५५ मी.
अंबा/ ८.०० मी. / ९.०० मी. / ७.७० मी.
कुंडलिका/ २३.०० मी. /२३.९५ मी. /२२.७० मी.
पाताळगंगा /२०.५० मी. /२१.५२ मी./ १९.८५ मी.
उल्हास / ४८.१० मी./ ४८.७७ मी. ४३.५० मी.
...................
अंबा नदीला पूर
सुधागडामध्ये मुसळधार पाऊस; भेरव पुलावरून पाणी
पाली, ता. १६ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सोमवारी अंबा नदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. भेरव येथील आंबा नदी पुलावरून पाणी गेले. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. भेरव येथील अंबा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळित झाले. तसेच शाळकरी विद्यार्थी व नोकरदारवर्गाची गैरसोय झाली. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिलाच दिवस होता, मात्र स्कूल बस व एसटी बस नदीपलीकडे अडकल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.
पुलावर कचरा
पुराच्या पाण्याने वाहून आलेला कचरा, लाकडाचे ओंडके, प्लॅस्टिक पिशव्या भेरव अंबा नदी पुलावर अडकले आहेत. त्यामुळे पुलावर मातीचे व कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते अतिश सागळे, सतीश मांढरे यांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते ललित ठोंबरे यांच्या जेसीबीच्या सहाय्याने कचरा बाजूला करून वाहनांसाठी रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पाली ः अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक खोळंबली.
पाली ः नदी पुलावरून पाणी गेल्याने कचरा वाहून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.