अंबा नदीने ओलांडली धोकापातळी
पाली, ता. १९ (वार्ताहर) ः मुसळधार पावसामुळे गुरुवारी (ता. १९) भेरव येथील अंबा नदी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. पाली-रवाळजे मार्गावर नांदगाव येथील सरस्वती नदीवरूनही पाणी गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. वाकण- पाली- खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला सखल भागात पाणी भरले होते. तसेच दापोडे गावाजवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक बंद होती. पावसाचा जोर वाढल्याने सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून कामासाठी निघालेले नोकरदार, प्रवासी तसेच विद्यार्थ्यांचे हाल झाले.
संततधारेमुळे पाली पोलिस ठाणे हद्दीतील अंबा नदीवरील पाली- वाकण- खोपोली मार्गावर उन्हेरे व पालीजवळ अंबा नदीने धोका पातळी ओलांडली. पुलालगतचे दोन्ही बाजूस मुख्य रस्त्यावर पाणी भरल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूची वाहतूक बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली होती. तसेच याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खुरावले फाटा येथील भेरव गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. सरस्वती नदीची पातळी वाढल्यामुळे नांदगाव येथील नुकताच झालेल्या पुलावरूनही पाणी गेले, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
पाली वाघजाईनगर येथील किल्ल्याच्या मातीचा भाग व दगड अतिवृष्टीमुळे खचले. याची माहिती मिळताच पाली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष प्रणाली शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित व दक्ष राहण्याचे आवाहन केले.
पाली बसस्थानक पाण्यात
पाली बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अनेक दिवसांपासून ठप्प आहे. जुनी बसस्थानक इमारत तोडून तेथील राडारोडा स्थानकातच आहे. तसेच स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मुसळधारेमुळे गुरुवारी (ता. १९) स्थानकाच्या संपूर्ण आवारात पाणी भरले होते. त्यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांची गैरसोय झाली.
पूल उंच, मात्र जोडरस्त्यावर पाणी
अंबा नदीवर नुकताच उंच व रुंद पूल बांधण्यात आला आहे. या आधी अंबा नदीवरील जुना पूल हा अरुंद व उंचीने छोटा होता. तसेच त्याची क्षमताही कमी होती. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाऊन वाहतूक कोंडी व वाहतूक ठप्प होत होती. नवीन रुंद व उंच पूल बांधल्यामुळे ही समस्या संपुष्टात येऊन पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहील, अशी अपेक्षा स्थानिकांना होती; मात्र नवीन पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता हा खाली असल्यामुळे आता पुलावरून पाणी न जाता या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर पाणी साचते आणि दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होते. एमएसआरडीसी प्रशासनाने या दोन्ही बाजूला मोरी टाकणे किंवा उंच रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सखल भागात पाणी
वाकण- पाली- खोपोली राज्य महामार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला द्रुतगती मार्गाने जाणारे प्रवासी व वाहनेही याच मार्गावरून जातात. हा मार्ग सुस्थितीत असल्यामुळे अनेक प्रवासी व वाहने याचा वापर करतात; मात्र पाली अंबा नदी पूल झाला असूनही पुलाच्या दोन्ही सखल बाजूला पाणी साचल्यामुळे प्रवासी व वाहने दोन्ही बाजूस अडकून पडतात व त्यांची गैरसोय होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.